मारला धक्का तरी पडेल कठडा...
By Admin | Updated: January 15, 2015 23:33 IST2015-01-15T21:33:29+5:302015-01-15T23:33:05+5:30
सालपे घाट : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात; उपाययोजना करण्याची मागणी

मारला धक्का तरी पडेल कठडा...
पिंपोडे बुद्रुक : सालपे घाटातील संरक्षक कठडे जीर्ण झाले आहेत. हाताने कठडा ढकलला तरी तो ढासळत आहे. त्याचबरोबर रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांसह घाटातील प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. बांधकाम विभागाचे मात्र या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने दिसून येत आहे.सातारा-पुणे राज्य महामार्गावर वाठारस्टेशनपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हा घाट आहे. घाटाच्या पायथ्याला सालपे गाव असल्यामुळे या घटाला सालपे घाट असे संबोधले जाते. घाटाची लांबी दोन किलोमीटरच्या आसपास आहे. घाटाच्या अलिकडे आदर्की फाट्यावर वाठार पोलिसांची आणि घाट पायथ्याला लोणंद पोलिसांची मदत केंद्रे आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहने साताऱ्याहून लोणंद मार्गे पुणे-मुंबईच्या दिशेने जात असतात. त्याचबरोबर दौंड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. सध्या लोणंद आणि शिरवळ येथे नव्याने विकसीत होत असलेली औद्योगिक वसाहत आणि नागरिकीकरणामुळे या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचेच दिसून येते. घाटात यापूर्वी बऱ्यावेळा अपघात झालेले आहेत. मात्र अद्यापही त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशी व वाहनचालकांमध्ये निर्माण झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपूर्वी घाटातील संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हाताने कठडा ढकलला तरी तो ढासळत आहे. तो संरक्षण कठडा वाहनांचे संरक्षण काय करणार? हाच खरा प्रश्न आहे. घाट रस्त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी दुर्घटना घडल्यासच लक्ष देणार का? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. (वार्ताहर)
अपघातांचे प्रमाण वाढले
गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी वाठारस्टेशनच्या बाजूने घाटमाथ्यावरील १०० मीटर अंतरावर संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खडी विखुरली आहे. त्या खडीवरून घसरून दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. मोठ-मोठे खड्डे आणि तीव्र चढ-उतारामुळे अवजड वाहने कमी वेगाने चालवावी लागतात. या संधीचा फायदा घेऊन ट्रक अथवा ट्रेलरच्या मागील बाजूने गाडीत चढून साहित्याची चोरी करणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत.
घाटातील दगडी संरक्षक कठडे पन्नास ते साठ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाईल.
- के. पी. मिरजकर, उपअभियंता, बांधकाम उपविभाग, खंडाळा
अर्धा घाट रस्ता खराब आहे. संरक्षक कठड्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. चालकाचे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी हा घाट जीवावर बेतू शकतो. त्यामुळे संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे.
वसंतराव इंगवले, वाहनचालक
बारामती