तात्यांमुळेच झाला मार्डी गावाचा कायापालट

By Admin | Updated: April 1, 2016 01:50 IST2016-04-01T01:49:05+5:302016-04-01T01:50:57+5:30

माणचे किंगमेकर सदाशिवराव पोळ : सिमेंट काँक्रीटचे रस्ते, लोकसहभागातून बंधाऱ्यांचे मोठे काम

It was due to Tatya that the turn of the Mardi village was changed | तात्यांमुळेच झाला मार्डी गावाचा कायापालट

तात्यांमुळेच झाला मार्डी गावाचा कायापालट

शरद देवकुळे -- पळशी माण तालुक्यातील शिंगणापूर म्हसवड मार्गावर वसलेले मार्डी गाव आता प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहे. गावात झालेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते, शाळा, बाजारपेठ, सुसज्ज आरोग्य केंद्र, बँका आदी सुविधा दिसत आहेत. माणचे किंगमेकर आणि माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांचे गावाच्या प्रगतीसाठीचे योगदान मोठे आहे.
पोळ तात्या राजकारणात येण्यापूर्वी गावात सुविधांची वानवाच होती. गावात पहिली ते सातवीपर्यंतच शाळा. त्यानंतरच्या शिक्षणासाठी गाव सोडावे लागत होते. तात्या राजकारणात आल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्यांचे लोंढे थांबविण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर गावात माध्यमिक शाळा सुरू झाली. याबरोबरच बँक, पतसंस्था, ग्रंथालय यांची उभारणीही करण्यात आली. गावच्या सरपंच कौशल्या पोळ व उपसरपंच राहुल सावंत हे विकासाची परंपरा जपत आहेत. नुकतेच या गावाने डॉल्बीमुक्तीचा ठरावही केला. ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे उत्तम नियोजन केले आहे. गावातील दोन विंधन विहिरींमार्फत व दोन मिनी वॉटर सप्लायमार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून व मार्डी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीयुक्त सहभागातून सीसीटीव्हीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तीन बंधाऱ्यांचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. गाव परिसरात बांधबंदिस्त व बंधाऱ्यांची कामे नेहमी सुरू असतात. पावसाचे पडलेले पाणी वाया जावू नये म्हणून पंधरा बंधारे ठिकठिकाणी बांधले आहेत. पावसाळ्यात हे बंधारे पुर्ण क्षमतेने भरल्यास भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायमचाच मिटेल अशी अशा येथील ग्रामस्थांना आहे.
मार्डी ग्रामपंचायत आता ६८ वर्षांची झाली आहे. गावची लोकसंख्या पाच हजार असून, २२ वाड्या नांदत आहेत. शुक्रवार हा येथील आठवडी बाजार दिवस असून, गावात प्रशस्त बाजार पटांगण आहे. गावात हनुमान मंदिर, राम मंदिर, महालक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर, भवानी देवी मंदिर असून, सालाबादप्रमाणे येथे यात्रा, उत्सव भरतात. गावात मतभेद असले तरी गावाच्या विकासाच्या आड कोणीही येत नाही. पोळ तात्यांची ही शिकवण गावकऱ्यांनी अजूनही जोपासली आहे.
मार्डीचे ग्रामदैवत भवानी देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला डोंगरावर आहे. ‘भवानी आईचा डोंगर’ या नावानेच ही पर्वतरांग ओळखली जाते. पोळ तात्यांच्या प्रयत्नातूनच या डोंगरावर जाण्यासाठी वाहनांना डांबरी रस्ता तसेच डोंगर चढण्यासाठी पायऱ्याही बांधल्या आहेत.
गावात दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी यांची संख्याही मोठी आहे. गावातील शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून आहे. विहिरींमार्फत पिकांना पाणी दिले जाते.
गेल्या तीन वर्षांपासून पाऊस वेळेवर होत नसल्याने गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा मार्ग अवलंबला आहे. ज्वारी, बाजरी, कांदा यासारखी पिके घेतली जातात. तर मार्डीचे डाळिंब फळ बागांचेही उत्पादन चांगले आहे. गावात तरूण मंडळे विधायक आणि सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभाग घेत आहेत.


व्यसनमुक्ती, पाणलोट
अन् बरंच!
डॉ. संदीप पोळ, डॉ. माधव पोळ, संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गावात प्रशिक्षण कार्यक्रम, आनंद अनुभूती कार्यक्रम, नवचेतना शिबिर, बसेकी कोर्स आदींचे आयोजन केले जाते. याबरोबरच व्यसनमुक्ती, पाणलोट विकास, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या याबाबतही जनजागृती केली जात आहे. मना मनावर उत्तम संस्कार घडत असल्याने गावात वादाविवाद होण्याचे प्रसंग अगदीच तुरळक आहेत.

मार्डी गाव तिन्ही बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेले आहे. बंधाऱ्यांसाठी योग्य भौगोलिक रचना नसल्याने लोकसहभागातून आणखी बंधारे बांधण्याची योजना आहे. या सर्व कामांसाठी शासन दरबारी आम्ही अर्ज करून पाठपुरावा करत आहे.
- कौशल्या पोळ, सरपंच मार्डी

Web Title: It was due to Tatya that the turn of the Mardi village was changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.