चिंध्यातून बनवितोय ‘तो’ सतरंजी अन् गालिचा!
By Admin | Updated: December 15, 2015 00:51 IST2015-12-14T22:26:14+5:302015-12-15T00:51:49+5:30
टाकाऊपासून टिकाऊ : उत्तर भारतातल्या कलाकाराचा छंद बनला पोटापाण्याचा व्यवसाय

चिंध्यातून बनवितोय ‘तो’ सतरंजी अन् गालिचा!
सातारा : टाकाऊ वस्तंूपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा व्यवसाय अनेकजण करतात. पण ज्याला आपण चिंध्या म्हणून फेकून देतो अशा फाटक्या कपड्यांतून नक्षीदार सतरंजी, चादर, गालिचा बनवून मिळत असेल तर... चिंध्यापासून घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तूची निर्मिती एक कलाकार दिल्लीहून साताऱ्यात आलाय. हॅन्डलूम मशिनवर तो फाटक्या कपड्यांतून आकर्षक अशा सतरंजी, चादरी तयार करत आहे.
सातारा येथील सदर बझार परिसरात उत्तर भारतातून आलेल्या पप्पू यादव या कारागिराने असा व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो हॅन्डलूम मशिनच्या साह्याने खराब कपड्यांपासून चटई, सतरंजी, चादर, बस्कर, बेडशिट, गालिचा अशा वस्तू बनवत आहे. त्याला जुन्या साड्या, कपडे दिल्यास त्यापासून तो आकर्षक अशा वस्तू तयार करून देतो. ओढणी, साडी यापासून तो तासाभरात सुंदर असे बस्कर बनवितो, तर दोन तासांत चादर बनवितो. चटई बनविण्यासाठी जुन्या आठ साड्या दिल्या की मजबूत चटई तयार करून देतो. विविध प्रकारच्या आकारात अत्यंत कुशलतेने तो सुंदर वस्तू बनवितो.
जुन्या कपड्यांमधून घराची शोभा वाढविणारी सतरंजी करण्यासाठी दोन किलो जुने कापड आणि तीनशे रूपये मजुरी, चादरीसाठी दीड किलो जुने कापड आणि चारशे रूपये मजुरी तर बस्करसाठी दोन साड्या व साठ रुपये मजुरी व चटई तयार करण्यासाठी आठ साड्या व दीडशे रुपये मजुरी तो घेतो. (प्रतिनिधी)