मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा लोखंडी साकव नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:56+5:302021-03-21T04:38:56+5:30
कास तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा साकव दुरवस्थेत असून, या व्हॉल्व्हकडे जाऊन फोटोसेशन, सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. परंतु ...

मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा लोखंडी साकव नादुरुस्त
कास तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जाणारा साकव दुरवस्थेत असून, या व्हॉल्व्हकडे जाऊन फोटोसेशन, सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. परंतु हा लोखंडी साकव बऱ्याच ठिकाणी धोकादायक असल्याने एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कास तलावाच्या व्हॉल्व्हकडे बऱ्याचदा पाटकरींनाही व्हॉल्व्ह चालू अथवा बंद करण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागते. पावसाळ्यात वाऱ्याच्या प्रचंड वेगासह सर्वत्र डोळे फिरतील, असे पाणी दिसते. याचा अनुभव जवळून घेण्यासाठी काही उत्साही पर्यटक विविधप्रकारे स्टंट व हुल्लडबाजी करत असतात.
उन्हाळ्यात पाणी पातळी खालावल्याने वीस ते पंचवीस फूट खोलीवर मोठी दगडी असून, पाय घसरून तोल न सावरल्यास जिवावर बेतण्याची परिस्थिती उद्भवू शकते. या व्हॉल्व्हकडे जाणारा पूल कित्येक वर्षे दुरवस्थेत आहे. हा लोखंडी पूल पूर्णतः गंजलेल्या स्थितीत आहे. साकवाचे लोखंडी पट्ट्या असणारे काही टप्पे दुरवस्थेत आहेत. लोखंडी पायरी तुटली असून, त्याऐवजी लाकडाची फळी बसवल्याने कुजून तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अँगलही धोकादायक आहेत. अशा परिस्थितीत कित्येक पर्यटक उडी मारून या व्हॉल्व्हकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अंदाज न आल्यास तोल जाऊन एखादा अपघात होण्याचा संभव आहे. त्यामुळे या लोंखडी साकवाची तात्काळ दुरूस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट
सूचना फलक आवश्यक!
असुरक्षित असलेल्या या मुख्य व्हॉल्व्हकडे जाताना धोक्याची सूचना देणारा फलक लावणे अत्यावश्यक असून, स्टंट, हुल्लडबाजीला आळा बसावा, यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी पर्यटक करत आहेत.
कोट
तलावाचे दृश्य पाहण्यासाठी काही पर्यटक जिवाशी खेळून या साकवावरून मुख्य व्हॉल्व्हकडे जाण्याचा प्रयत्न करतात. हा साकव बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून, याची दुरुस्ती होणे अत्यावश्यक आहे.
- गणेश मोहिते,
सातारा
फोटो
२०कास साकव
कास तलावातील साकव खूपच जुना असल्याने धोकादायक बनला आहे. (छाया : सागर चव्हाण)