भुर्इंज : कोल्ड ब्लडेड सिरियल किलर संतोष पोळला रविवारी (दि. २८) किकली, ता. वाई येथे पोलिसांनी आणले होते. संतोष पोळला किकलीत आणल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. संतोषचे भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाशी असलेल्या व्यावसायिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाच्या किकलीतील कारखान्यावर पोलिसांनी चौकशी केली असून, याबाबत अधिक तपशील पोलिसांनी उघड केला नाही. किकली देगाव रस्त्यावर भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाचा कोंबडी खाद्याचा कारखाना आहे. तर या उद्योगाचे मुख्य कार्यालय पाचवड येथे आहे. भैरवनाथ पोल्ट्री उद्योगासोबत संतोष पोळचे व्यावसायिक संबंध होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी संतोषला किकली येथे आणले होते. संतोष पोळला घेऊन पोलिस भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाच्या कारखान्यात आले. येथे बराचवेळ संतोष पोळला घेऊन पोलिसांनी चौकशी केली. याबाबत भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाच्या संचालकांशी संपर्क साधला; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. तर याबाबत पोलिस निरीक्षक विनायक वेताळ म्हणाले, पोलिस तपासात संतोष पोळने भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाशी व्यावसायिक संबंध असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने तेथे जाऊन चौकशी व तपास केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
व्यावसायिक संबंधावरून भैरवनाथ पोल्ट्री उद्योगाची चौकशी
By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST