ऐन आचारसंहितेत घेतल्या मुलाखती
By Admin | Updated: November 5, 2014 00:05 IST2014-11-04T21:11:05+5:302014-11-05T00:05:01+5:30
भरतीवरच प्रश्नचिन्ह : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील ९१ उमेदवारांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न भंगले

ऐन आचारसंहितेत घेतल्या मुलाखती
जगदीश कोष्टी - सातारा -राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत भरती झालेल्या ९१ कर्मचाऱ्यांना फुकट राबविल्याने संताप व्यक्त होत असतानाच सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या ९१ कर्मचाऱ्यांची भरतीच मुळात ऐन आचारसंहितेच्या काळात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही भरतीच बेकायदा असल्याची खळबळजनक माहिती समोर येऊ लागली आहे.
आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २,२९८ अकाउंन्टंट कम डाटा एन्टी आॅपरेटरची (लिपिक) भरती करण्याचा ठेका मुंबई येथील ईगल सिक्युरिटी अॅण्ड पर्सनल सर्व्हिसेसला दिला होता. त्यानुसार फेबु्रवारी, २०१४ पासून कर्मचार पुरवठा करण्यास सुरुवातही झाली.
कर्मचाऱ्यांची भरती भलेही खासगी कंपनी करणार असली तरी ते कर्मचारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात काम करणार होते. त्यामुळे या पदांची भरतीही पारदर्शीपणे व शासकीय नियमांचे पालन करतच होणे आवश्यक होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्चपासून लागू झाली होती. आचारसंहितेच्या काळात शासकीय नोकरीभरती प्रक्रिया स्थगित असते. मात्र, आचारसंहिता लागल्यानंतर लगेच चार दिवसांत या मुलाखती घेण्यात आल्या. ९ , १० मार्च रोजी या पदासाठी मुलाखती झाल्या. या मुलाखती घेताना कोणताही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष.
वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन थेट मुलाखतीसाठी बोलाविले होते. त्याठिकाणी दोन दिवस मुलाखती घेतल्यानंतर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांकडून कंपनीनेच २,१०० रुपये घेऊन त्यांना हजर होण्याचे पत्र दिले होते. त्या पत्रावर तारीख न देता पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांत हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेमून दिलेल्या ठिकाणी उमेदवार हजरही झाले. तेही चक्क आचारसंहितेतच. त्यांची नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती. ही मुदतही संपली आहे. तरीही त्यांना अद्याप पगार मिळालेला नाही.
‘लोकमत’ने फोडली होती वाचा
प्राथमिक आरोग्य केंद्रात अकाउन्टंट कम डाटा एन्ट्री आॅपरेटरपदी कार्यरत असलेल्या ९१ कर्मचाऱ्याचे पगार झालेले नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ सप्टेंबर रोजी ‘आरोग्य विभागातील कर्मचारी बिनपगारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याने भरडले गेलेले कर्मचारी एकत्र आले. त्यांनी वेळोवेळी विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला.
ंसरकारी नोकरीसाठी हॉटेलात मुलाखती
ईगल ही खासगी कंपनी भरती करुन घेणार असली तरी भरती होणारे कर्मचारी सरकारी कार्यालयात काम करणार होते. या भरतीकडे पाहताना प्रत्येक उमेदवार हा ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ची भरती म्हणून पाहत होता. सरकारी भरतीप्रक्रिया कोणत्याही खासगी जागेत होत नाही. मात्र, ही भरती सातारा शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ८ व ९ मार्च रोजी करण्यात आली.
संबंधित कंपनीने यासंदर्भात शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची विनंती केल्याचे समजते. मात्र, आचारसंहिता लागू होती. त्यामुळे शासकीय इमारत व अधिकारीही मदतीला आले नव्हते.