आंतरजातीय विवाह करणाऱ्यावर हल्ला
By Admin | Updated: June 26, 2014 00:40 IST2014-06-26T00:40:17+5:302014-06-26T00:40:30+5:30
कोरेगाव तालुक्यातील तिघांना अटक

आंतरजातीय विवाह करणाऱ्यावर हल्ला
रहिमतपूर : ‘आंतरजातीय विवाह का केला?’ या कारणावरून नलवडेवाडी (ता. कोरेगाव) येथील काहीजणांनी नीलेश मानसिंग कांबळे याला जातिवाचक शिवीगाळ करीत त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी रहिमतपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश मानसिंग कांबळे (वय २५, रा. रिसवड, ता. कऱ्हाड) याने नलवडेवाडी येथील मुलीशी आंतरजातीय विवाह केला आहे. त्यानंतर तो पत्नीला नेण्यासाठी सासरवाडी असलेल्या नलवडेवाडीत आला होता. यावेळी मुलीचे नातेवाईक संजय शंकर नलवडे, अजित धनाजी नलवडे (रा. नलवडेवाडी, ता. कोरेगाव) व प्रकाश लक्ष्मण इंगवले (रा. रिसवड, ता. कऱ्हाड) यांनी नीलेश कांबळेला जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच मुलीला नांदवण्यास नकार दिला. या प्रकरणी मानसिंग कांबळे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तिघांनाही अटक केली आहे.
दरम्यान, आरोपींना कोरेगाव न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. गायकवाड, हवालदार के. व्ही. जोशी, अरुण दुबळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)