इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
By Admin | Updated: June 14, 2016 00:23 IST2016-06-13T21:38:56+5:302016-06-14T00:23:44+5:30
पेठवडगाव नगरपालिका : आरक्षण, प्रभाग रचनेकडे लक्ष

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
सुहास जाधव-- पेठवडगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे़ या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सक्रिय झाली आहे़ मात्र, इच्छुकांनी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे़ तर इच्छुकांचे नगराध्यक्ष, संभाव्य प्रभाग रचना अनुकूल पडावी, यासाठी इच्छुकांकडून ‘देव’ पाण्यात घातले जात आहेत़
नगराध्यक्षपदासाठी पूर्वीचेच आरक्षण असणार की, नव्याने आरक्षण जाहीर होणार, तसेच प्रभाग रचना, आरक्षण जून महिन्यातच जाहीर होणार की लांबणीवर पडणार, याबाबत सध्या संभ्रमावस्था आहे़ १९९७ पासून पालिका नगराध्यक्षपदाचे आरक्षण सुरू झाले़ यावर्षी महिला प्रवर्गासाठी तर इतर मागासवर्गासाठी प्रत्येकी अडीच वर्षे नगराध्यक्षपद आरक्षित झाले़ तर २०११ला थेट जनतेतून सर्वसाधारण गटातून नगराध्यक्षपदाची आरक्षणानुसार निवडणूक झाली़ हे आरक्षण पाच वर्षांसाठी होते़ २००६ ला इतर मागासवर्गीयांसाठी, तर खुल्या गटासाठी प्रत्येकी अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण होते़ तर २०११ला अनुसूचित जातीसाठी, तर खुल्या गटातील महिला वर्गासाठी आरक्षित होते़ या पार्श्वभूमीवर अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षण अद्यापही झालेले नाही़
पालिका निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना होणार आहे़ या निवडणुकीसाठी आठ प्रभाग होणार आहेत. यानुसार प्रभाग रचना करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना आहेत़ मुख्याधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याचे समजते़ या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रिय झालेली आहे़ इच्छुकांचे लक्ष थेट नगराध्यक्ष, प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण याकडे आहे़ अनेकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची यासाठी मशागत केली आहे़ अनुकूल आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी ‘देव’ पाण्यात घातले आहेत़ त्याचबरोबर युवा पिढीही पालिका निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे़
यादव, सालपे नंतर कोण ?
१९७४ ला थेट निवडणुकीत यादव गटाचे नेते विजयसिंह यादव, तर युवक क्रांती आघाडीचे नेते शिवाजी सालपे यांना २००१ मध्ये नागरिकांनी संधी दिली होती़ आता दोघेही हयात नाहीत़
त्यामुळे या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणते पडणार? तर थेट नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे़