पाणीगळती रोखण्यासाठी नळजोडांना मीटर बसवा - शंभूराज देसाई
By सचिन काकडे | Updated: December 5, 2023 17:54 IST2023-12-05T17:53:57+5:302023-12-05T17:54:43+5:30
सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

पाणीगळती रोखण्यासाठी नळजोडांना मीटर बसवा - शंभूराज देसाई
सातारा : शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे करत असताना पालिका प्रशासनाने पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट, पालिका प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर अभियंता दिलीप चिद्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, यावर्षी धरणातील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून, पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असेल तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करायला हवे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडांना मीटर बसवणे आवश्यक आहे. शहरात स्वच्छता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा. उड्डाण पुलांच्या मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करत असताना वृद्ध, बालके यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.
मुख्याधिकारी बापट यांनी पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाल्याने कास मधील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. प्रस्तावित कास पाणीपुरवठा योजना, शहर सुशोभीकरण, गोडोली तळे खोलीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकास आदी आदी प्रकल्पांची त्यांनी तपशीलवार माहिती दिली.