सूचनांना हो हो.. काम मात्र शून्य

By Admin | Updated: April 30, 2016 00:58 IST2016-04-29T21:51:48+5:302016-04-30T00:58:19+5:30

कऱ्हाड : अधिकारी आक्रमक; पाणीपुरवठा विभागावर ताशेरे; जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश--पंचायत समिती मासिक सभा

The information is zeros | सूचनांना हो हो.. काम मात्र शून्य

सूचनांना हो हो.. काम मात्र शून्य

कऱ्हाड : पावसाळा सुरू होण्यास अजूनही किमान दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. विशेषत: तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईची भीषण अवस्था आहे. तुम्ही आमच्या सूचनांना केवळ हो हो म्हणता, प्रत्यक्षात काम मात्र शून्य असते. या शब्दांत सभापती देवराज पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
येथील पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी देवराज पाटील होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.
पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यावेळी सभापती पाटील यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत तालुक्यातील जलसंधारणाची कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली. जलयुक्त शिवार योजना केवळ माण-खटाव तालुक्यासाठी नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. योजनेत समाविष्ट १३ गावांमध्ये जून महिना सुरू होण्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता
महेश आरळेकर यांनी जिल्हा परिषदेकडे बोअरवेलसाठी पाठवलेले ३९ पैकी २३ प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले.
यावेळी ज्या गावांमध्ये खोदलेल्या बोअरवेलना पाणी लागले नाही. त्याठिकाणी पुन्हा भूजल सर्वेक्षण करून नवीन बोअरवेल खोदण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. रूपाली यादव यांनी
बोअरवेल मारताना अगोदर त्याठिकाणी योग्य प्रकारे भूजल सर्वेक्षण करावे. विनाकारण शासनाचा निधी वाया घालवू नये, अशी मागणी केली.
भाग्यश्री पाटील यांनी आरफळ कॅनॉलला ५ मे पर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित इतर सदस्यांनी सांगितले की, आरफळ कॅनॉल परिसरातील विहिरींचे जलस्त्रोत टिकून राहावे यासाठी तरी पाणी सोडण्याची गरज आहे. गरज नसतानाही सलग ६२ दिवस आरफळ कॅनॉलला पाणी सोडण्यात येत होते. आता गरज असताना मात्र कॅनॉल कोरडा खडखडीत पडला आहे. माण-खटाव किंवा सांगली जिल्ह्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र नेहमीच टंचाईग्रस्त बनून राहिलेल्या मसूरच्या पूर्व भागालाही पुरेसे
पाणी उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच पाटबंधारे विभागालाही ठराव दिला
पाहिजे. प्रसंगी यासाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्याची गरज आहे.
शेरे-शेणोली परिसरात तीन महिन्यांपूर्वी विजेच्या अतिरिक्त दबावामुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे वीज कंपनीकडून अजूनही केला नसल्याबद्दल अनिता निकम यांनी नाराजी व्यक्त केली. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी बजेटचे कारण आणखी किती दिवस सांगणार? या शब्दांत सभापतींनी आपली नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

पाणी आहे; पण वीज नाही!
घोलपवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी उपलब्ध झाले आहे. परंतु वीज कनेक्शनअभावी त्या पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना करता येत नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत संबंधित विहिरींचे अधिग्रहण करू देण्यासही संबंधित शेतकरी तयार आहेत. त्यामुळे या विहिरींचे पाणी उपलब्ध झाल्यास गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही. तातडीने वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The information is zeros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.