पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी वृक्षलागवड करावी : मांडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:36+5:302021-07-03T04:24:36+5:30
खटाव : ‘वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे निसर्गाचा अर्थातच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रचंड प्रमाणात ...

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी वृक्षलागवड करावी : मांडवे
खटाव : ‘वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे निसर्गाचा अर्थातच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रचंड प्रमाणात देशी वृक्षलागवड करायला हवी. यासाठी समाज जागृती अभियान फार महत्त्वाचे आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रयास सामाजिक संस्थेमार्फत ठिकठिकाणी ‘नक्षत्र वन’ या उपक्रमातून देशी वृक्षांची लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे,’ अशी माहिती प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे यांनी दिली.
खटाव, ता. खटाव येथील पोवई गणेश टेकडी येथे नक्षत्र वन वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाप्रसंगी खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, प्रयास सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, प्रयास संस्थेचे सर्व सदस्य, पोवई गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमर देशमुख, उपाध्यक्ष राजाराम शिंदे, हणमंत रजपूत, किरण राऊत, नानासाहेब जाधव, विलास देशमुख, महेश चव्हाण, रामभाऊ भूप, राजेंद्र डोंबे, दीपक भोसले, सौरभ पवार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाप्रसंगी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. या नक्षत्र वन लागवडीत वड, पायरी, बेल, नागकेशर, काटेसावर, मोह, फणस, शमी, आंबा, कुचला, उंबर, पिंपळ, खैर, वेत, जांभूळ, आवळा, कडुनिंब, कदंब, अर्जुन, जाई, पळस अशा दुर्मिळ देशी वृक्षांचा समावेश आहे. प्रयास सामाजिक संस्थेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण व संवर्धनच नव्हे तर जल संधारण, मृदा संधारणा, स्वच्छता अभियान तसेच झाडांचा वाढदिवस व झाडांना रक्षाबंधन असे नवनवीन व समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या संस्थेचे समाजाच्या विविध स्तरांतून कौतुक होत असते.