सातारा : नागठाणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये दोन कोटी चार लाख रुपयांचा घोटाळा केला असून, संबंधित लोकांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोहिते या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.
याप्रकरणी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नागठाणे ग्रामपंचायतीचे २०१५ पासून २०२० पर्यंत असलेले सरपंच, वरिष्ठ लिपिक आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ६८ गाळे बांधण्याचा आराखडा तयार केला. त्यानुसार ६८ लोकांकडून तीन लाख रुपयेप्रमाणे पैसे काढले. याला एक वर्ष झाले तरी अद्याप कोणतेही बांधकाम सुरू झालेले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. सरपंच, वरिष्ठ लिपिक आणि ग्रामसेवक यांनी सुमारे दोन कोटी चार लाखांची फसवणूक केली आहे. तरी संबंधितांची चौकशी करून आठ दिवसांत कारवाई करावी, अन्यथा सर्व गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.