सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 13:57 IST2022-01-04T13:57:32+5:302022-01-04T13:57:52+5:30
प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत, तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत.

सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज, मंगळवारी शंभराच्याजवळ जाऊन पोहोचला. २ हजार ८३८ तपासण्यांमधून तब्बल ९८ बाधित आढळून आले आहेत. रुग्ण वाढीचा दर ३.४५ टक्के इतका वाढला असून जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत असताना ३१ डिसेंबर पासूनच रुग्ण वाढीला सुरुवात झाली. वर्षाअखेरीस ४८ रुग्ण बाधित आढळले होते. १ जानेवारीला - ५३, २ जानेवारीला - ६५, ३ जानेवारीला - ६३ तर आता ४ जानेवारीला - ९८ इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढले आहेत.
नवीन वर्षामध्ये रुग्ण संख्या वाढू लागली आहे. कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत. लग्नसोहळे राजकीय कार्यक्रमांना प्रचंड मोठी गर्दी उसळताना पाहायला मिळते.
अंत्यविधीसाठी देखील लोक गर्दी करतात. अनेक जण बाजारपेठेमध्ये फिरत असताना तसेच एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असताना हॉटेलमध्ये एकत्र आल्यानंतर मास्कचा वापर करत नाहीत असे दिसते. या रुग्ण वाढीमुळे भविष्यामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.
रुग्ण वाढीचा दर असाच वाढत राहिल्यास प्रशासनाला देखील नियंत्रण राखणे शक्य होणार नाही. सध्याच्या घडीला जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. कंत्राटी पद्धतीने घेतलेले आरोग्य कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. कोरोनाची लाट उसळली तर लोकांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे.