खटावमध्ये विटेकर वस्तीजवळून बेकायदा वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST2021-05-16T04:38:39+5:302021-05-16T04:38:39+5:30
खटाव : खटाव येथील विटेकर वस्ती येथून येरळा नदीचे पात्र गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथून बेकायदा वाळू उपसा ...

खटावमध्ये विटेकर वस्तीजवळून बेकायदा वाळू उपसा
खटाव : खटाव येथील विटेकर वस्ती येथून येरळा नदीचे पात्र गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथून बेकायदा वाळू उपसा होत आहे. त्यामुळे येथे मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक अपघातही झाले आहेत.
नदी पात्रालगत असलेल्या शेतशिवारापर्यंत आता वाळू माफियाची मजल गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे तर नुकसान होत आहेच, त्याचबरोबर नदीचे वाहणारी दिशाही बदलू लागली आहे.
विटेकर वस्तीजवळ तर नदीपात्राशेजारी असलेल्या शेतातील बांधीव विहिरीलाही तडे गेले आहेत. हा बेकायदा वाळू उपसा थांबवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
येरळा नदीपात्रातून वाळू उपसा होत आहे. हा वाळू उपसा हळूहळू खोदत-खोदत शेतापर्यंत आला आहे. वाळू उपसण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींनाही धोका पोहोचला आहे. हा वाळू उपसा असाच सुरू राहिला, तर शेतातील विहिरी गायब होतील आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.
विटेकर वस्तीतील लोकांनाही या वाळू वाहतुकीचा, भरधाव जाणाऱ्या वाहनाचा, तसेच वाळू उचलणाऱ्या लोकांचा त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारी केल्यानंतरही वाळूच्या चोरट्या वाहतुकीच्या वेळी महसूल विभागातील कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावयाची, असा प्रश्न पडत आहे. प्रशासनाला वाळूचे लिलाव काढू दिले जात नाहीत आणि परस्पर वाळू काढून विकली जाते. त्यामुळे एका बाजूला विरोध आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाचे नुकसान असा या ठिकाणचा प्रकार समोर येत आहे.
कोट
गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरू आहे. आता अगदी नदीपात्राच्या कडेपर्यंत उपसा करत आले असून, त्यामुळे आमच्या शेतातील विहिरीला तडे गेले आहे. मोठ्या कष्टाने बांधलेली विहीर खचली, तर शेतीचे आणि विहिरीचेही मोठे नुकसान होणार आहे. याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे.
अभयसिंह शिंदे - इनामदार, शेतकरी
कोट
सद्या कोरोनाचे काम असल्यामुळे या बाबीकडे नकळत जरी दुर्लक्ष झाले असले, तरीही येथील तक्रार आली, तर मात्र या बेकायदा वाळू उपसणाऱ्या लोकांना वेळीच आवरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तरीही खटावमधील विटेकरवस्तीलगत असणाऱ्या येरळा नदी पत्रातून होत असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी स्वतः जाऊन संबंधितावर करावाई करेन.
किरण जमदाडे
तहसीलदार