आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटविणार ‘आई’
By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T21:54:27+5:302015-01-29T00:13:12+5:30
युवकाचे वय अंदाजे ३० ते ३५ असून, त्याच्या एका हातावर ‘आई’ असे गोंदण्यात आले आहे.

आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटविणार ‘आई’
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे येथे असणाऱ्या उरमोडी नदी पुलावरून एका अनोळखी युवकाने उडी टाकून आत्महत्या केली. या युवकाची ओळख अजूनही पोलिसांना पटलेली नसून त्याच्या हातावर ‘आई’ असे गोंदण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस या युवकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, नागठाणे जवळूनच उरमोडी नदी वाहते. येथे असलेल्या पुलावरून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका तीस वर्षीय युवकाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना नदीपात्राच्या कडेला कपडे धूत असलेल्या महिलांनी पाहिली. यानंतर त्याची माहिती बोरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली.दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवकाचे वय अंदाजे ३० ते ३५ असून, त्याच्या एका हातावर ‘आई’ असे गोंदण्यात आले आहे. त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचे स्वेटर आणि राखाडी रंगाची पँट आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास बोरगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही बोरगाव पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)