माण विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठीच लढविणार

By Admin | Updated: June 24, 2014 01:40 IST2014-06-24T01:36:44+5:302014-06-24T01:40:50+5:30

शेखर गोरे : साताऱ्यातील पत्रकार परिषदेत घोषणा

I will fight for the victory of the legislative assembly elections | माण विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठीच लढविणार

माण विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठीच लढविणार

सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्यावर व विशेषत: तरुणवर्ग आणि महिला यांच्या आग्रहामुळे शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून माण विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठीच लढविणार असून आता माघार नाही, अशी घोषणा माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांनी केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोरे म्हणाले, माण-खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत विकासकामांत मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. काही विभागाचे अधिकारी राजकीय दबावामुळे भ्रष्टाचाराचे बळी ठरले आहेत. भ्रष्टचाराबरोबरच इतर शासकीय कामांत ‘कमिशनराज’ सुरू झाल्याने निकृष्ट कामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. अशा भ्रष्टाचार व कमिशनराजचा पर्दाफाश करून त्याचा बीमोड करण्याचा निर्धार केला आहे.’
माण-खटाव तालुक्यात सत्तेच्या जोरावर दहशत माजवून दमदाटी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. खोट्या केसेस दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असे सांगून गोरे म्हणाले, ‘अशा अपप्रवृत्तीचा बंदोबस्त करून मतदारसंघातील प्रत्येक गावात आंधळी पॅटर्न राबवून विकासकामे करणार आहे. आता येणारी विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठानच्या माध्यमातून लढविणार आहे. माण मतदारसंघातील जनता हाच माझा पक्ष असून, त्यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविण्याचा पक्का निर्धार केला आहे. ’
‘माण-खटावच्या जनतेला पाण्यापासून कायमस्वरुपी वंचित ठेवण्याचे पाप आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केले. कायमस्वरुपी पाण्याची सोय लोकप्रतिनिधींना करता आलेली नाही. आताच्या निवडणुकीतही अनेकजण पाणीप्रश्न घेऊन उतरतील. परंतु निवडणूक झाल्यानंतर पुढची निवडणूक येईपर्यंत पाणीप्रश्न तसाच लोंबकळत राहील. त्यासाठी आता जनरेटा उभा केल्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाहीत. जनतेला संघटित करुन सरकारला माण-खटावच्या जनतेचा हिसका दाखविण्यासाठी निवडणूक लढविणार आहे,’ असेही शेखर गोरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: I will fight for the victory of the legislative assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.