हास्यकल्लोळात सखी रमल्या
By Admin | Updated: November 24, 2014 23:13 IST2014-11-24T21:22:03+5:302014-11-24T23:13:04+5:30
दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांनी विनोदाचा खजिना सखींसमोर सादर केला.

हास्यकल्लोळात सखी रमल्या
फलटण : येथील ‘लोकमत सखीमंच’ आयोजित दिलीप हल्याळ व मृदुला मोघे यांच्या ‘हास्यषटकार’ या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली आणि त्यानंतर दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे यांनी विनोदाचा खजिना सखींसमोर सादर केला. कलाकारांच्या उत्तुंग अभिनय अविष्कार या निमित्ताने सखींना पाहायला मिळाला. कार्यक्रमामध्ये विनोदाबरोबरच मंत्रमुग्ध करणारी नव्या व जुन्या जमान्यातील गाणीही सखींना ऐकण्यास मिळाली.दिलीप हल्याळ आणि मृदुला मोघे या दोघांनी लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण या आयुष्याच्या तिन्ही कालखंडाचे विनोदातून वर्णन केले. लहानपण सांगताना मुलेही किती हुशार झाली आहेत आणि ती मोठ-मोठ्या माणसांची सुध्दा फजिती करू शकतात, हे त्यांनी आपल्या विनोदातून सांगितले. तरुणपण सांगताना आपण प्रेमात कसे पडलो, प्रेम पडल्यावर कसे वाटते. ‘पाऊस नसतानाही चिंब भिजल्यासारखे वाटते’ असे सांगून हल्याळ यांनी टाळ्या मिळविल्या. कॉलेजमध्ये काय काय किस्से घडतात आणि कॉलेज लाईफ संपल्यानंतर सुरुवात होते ती संसाराची. त्यामध्ये नवरा-बायकोमधील भांडणे, विनोदी रुपात त्यांनी मांडली. पुण्यामधील लोकांची संस्कृती आणि त्यांचे स्वभाव हे देखील त्यांनी आपल्या अभिनयाने सखींसमोर मांडले. शेवटी-शेवटी म्हातारपणी मुलं सोडून गेल्यावर आई-वडिलांची काय अवस्था होते, हे त्यांनी विनोदातून अत्यंत चांगल्या पध्दतीने सांगत भारतीय संस्कृती विशद केले.
तीन तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये सखींनी टाळ्यांचा पाऊस पाडला. या कार्यक्रमाच्या शेवटी चंदूकाका सराफ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या मानकरी विजया मोहन कोरे या ठरल्या. यावेळी सखी ब्युटी पार्लरतर्फे फेशियलचा लकी ड्रॉ काढण्यात आला. (प्रतिनिधी)