वादळी गारपिटीचा तडाखा!

By Admin | Updated: June 3, 2016 00:50 IST2016-06-02T23:00:12+5:302016-06-03T00:50:28+5:30

घरांवरील पत्रे उडाले : वृक्ष-खांब कोसळले !

Hurricane hail hit! | वादळी गारपिटीचा तडाखा!

वादळी गारपिटीचा तडाखा!

सातारा : जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यात अनेक घरांवरील पत्रे उडाले. वृक्ष-खांब कोसळले. तसेच माण, वाई, कोरेगाव
तालुक्यांत वादळामुळे वीजपुरवठा खंंडित झाला. सातारा शहरातही रात्री नऊच्या सुमारास वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला होता.
यावर्षी प्रथमच जिल्ह्यात एकाच दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची घटना घडली. साताऱ्यातही अल्पसा पाऊस झाला. पाटण तालुक्यातील नाटोशी, कुसरुंड, मोरगिरी परिसराला पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यात काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. नाटोशीत विजेचे खांब जमीनदोस्त होऊन नुकसान झाले. कऱ्हाड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.
मलकापूर येथे काही दुकानगाळे व हॉटेलमध्ये पाणी शिरले. माण तालुक्यातील कुकुडवाड, वरकुटे मलवडी परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते.
वाई शहरातही गारांसह पाऊस पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. परिसरातील ओढ्यांना पाणी आले होते. कोरेगाव तालुक्यातही सायंकाळी सहानंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. सातारा तालुक्यातील अंगापूर, शेंद्रे भागातही पाऊस पडत होता. (प्रतिनिधी)
(संबंधित वृत्त हॅलो १)

Web Title: Hurricane hail hit!