दराअभावी शेकडो ट्रक कांदा ऐरणीत पडून
By Admin | Updated: August 29, 2016 00:03 IST2016-08-29T00:03:21+5:302016-08-29T00:03:21+5:30
आठ रुपये दर : बदलत्या वातावरणामुळे कोंब येणे, पाणी शिरल्याने नासण्याचे प्रमाण वाढले

दराअभावी शेकडो ट्रक कांदा ऐरणीत पडून
पुसेगाव : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा पिकाच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अवघे आठ ते दहा रुपये दर निघाल्याने शेकडो ट्रक कांदा अद्यापही ऐरणीतच पडून आहे. बदलत्या वातावरणामुळे त्या कांद्याला कोंब येणे, पाणी शिरल्याने कांदा नासणे तसेच काजळी चढून रंग बदलत असल्याने ऐरणीतच सुमारे साठ टक्के कांदा बाद होत आहे.
या परिसरात नाशिक गरवा कांद्याचे पाच महिन्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कमी भांडवलात जादा नफा मिळवून देणारे पीक असल्याने गेल्यावर्षी रब्बी हंगामात सर्रास शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. गोर्टी कांद्यापासून बी तयार करून शेतकरी आपल्याच शेतात स्वत:साठी तसेच विक्रीसाठी कांद्याचे रोपे तयार करतात. साधारणत: दीड महिन्याचे रोप लागवडी योग्य झाल्यानंतर आॅक्टोबरमध्ये सोयीनुसार कांदा पिकाची लागवड केली जाते.
गेल्यावर्षी खरिपासह रब्बी हंगामात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. तरीही उपलब्ध पाण्याच्या जोरावर या भागातील पुसेगाव, बुध, करंजओढा, फडतरवाडी, नेर, राजापूर, काटेवाडी, वेटणे, रणसिंगवाडी तसेच डिस्कळ, ललगुण, अनपटवाडी, शिंदेवाडी, नागनाथवाडी, जांब, जाखणगाव, विसापूर, पवारवाडी, वर्धनगड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
गेल्यावर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी नव्याने कांदा लागवड करण्यासाठी एकरी १५ ते २० हजारांची रोपे विकत घेऊन एकरी ५ हजार रुपये दराने कांदा लागवड करणाऱ्या महिला मजुरांकडून लागवड केली. रासायनिक खते, आंतर मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत थंडीचे प्रमाण तुलनेने कमीच राहिल्याने धुक्यामुळे कांद्यावर करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे औषधांच्या तीन-चार फवारण्या करून शेतकरी वैतागला होता. त्यातच सर्वत्र विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खोल गेलीय. (वार्ताहर)