शेकडो फूट बोअर मारूनही हातात कोरडी मातीच !
By Admin | Updated: March 18, 2016 23:57 IST2016-03-18T21:47:01+5:302016-03-18T23:57:01+5:30
भीषण टंचाई : कुसूर परिसरात तीन गावांसह आठ वाड्या तहानलेल्या; मार्चमध्येच चाललीय वणवण भटकंती--खोल-खोल पाणी !

शेकडो फूट बोअर मारूनही हातात कोरडी मातीच !
गणेश काटेकर -- कुसूर
कऱ्हाड-पाटणच्या हद्दीवरील डोंगर कपारीत वसलेल्या तारुख गावच्या वाड्या-वस्त्यांमध्ये दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासह पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील कुसूर, कोळेवाडी, तारुखसह परिसरात बामणवाडी, वानरवाडी, पवारवाडी, शिबेवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर कुसूर, कोळेवाडी, तारुख आणि इतर वाड्या-वस्त्या डोंगर पायथ्याशी वसल्या आहेत. या वाड्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेले आहे. तारुख गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर वांग नदी पात्राशेजारी असल्याने सध्यातरी पाणीटंचाई भासत नाही. मात्र नदीपात्रातील पाणीसाठा पूर्ण संपुष्टात आल्याने नदी कोरडी ठणठणीत झाली आहे. परिणामी, काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
कुसूर आणि कोळेवाडी या गावांच्या काही अंतरावरून वांग नदी वाहत असली तरी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदीपात्रापासून दूर असल्याने विहिरीतील तळ दिसू लागले आहेत. कोळेवाडी येथील विहिरीत एका बोअरवेलमधून पाणी उचलून चार दिवस साठा करून गावात पिण्यासाठी सोडले जात आहे. तर कुसूर गावाला आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे.
वानरवाडीसह बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी, शिबेवाडी, कारंडेवाडी आणि पवारवाडीसाठी वेगवेगळ्या तीन विहिरींतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, तिन्ही विहिरींना पाणी नसल्याने आठ दिवसांतून एकदा विहिरीत उपलब्ध झालेले पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. वानरवाडी विहीर पाझर तलावाशेजारी असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र, बारमाही पाणी असलेल्या वानरवाडी पाझर तलावाची पाणी पातळी प्रथमच कमालीची घटली आहे. त्यामुळे तलावाचा तळ दिसू लागला आहे.
बोअर मारूनही
हाती भुसा
पाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने विहिरीतील गाळ काढणे, पाणी स्त्रोत शोधण्यासाठी आडवी बोअर मारणे, उभी बोअरवेल पाडून पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. मात्र, भूगर्भातील पाणी पातळीच खालावल्याने या प्रयत्नांनाही यश येत नसल्याचे दिसते.
पाझर तलावाला गळती
कुसूरसह परिसरातील वाडी-वस्तीमध्ये उसाला प्राधान्य दिले जायचे; मात्र गत काही वर्षांपासून पाण्याच्या कमतरतेमुळे या विभागात ऊसपीक घेतलेच जात नाही. विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने शेतीला पाणी आणायचे कोठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे पाझर तलाव आहेत. मात्र ते गळतीमुळे असूनही नसल्यात जमा आहेत. पावसाळ्याचे प्रवाह आटत असताना या तलावातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे.