शंभर वर्षांपूर्वीचे अतिक्रमण अखेर निघाले
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-08T23:53:29+5:302014-12-09T00:26:45+5:30
जनजागृतीपर फलक : आदर्श गावाच्या वाटचालीसाठी कोंडवेचे सुशोभीकरण

शंभर वर्षांपूर्वीचे अतिक्रमण अखेर निघाले
कोंडवे : ग्रामसंसद अभियानांतर्गत खासदार उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतलेल्या कोंडवे ग्रामस्थांनी सोमवारी एकेची दर्शन घडवत सुमारे शंभर वर्षांपूवीचे अतिक्रमण हटवून दलित रस्ता खुला केला आहे. तसेच गावात निर्मल अभियान यशस्वी व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याच्या कडेला जनजागृती करणारे फलक लावले आहेत.
सातारा-मेढा रस्त्यापासून एक नवीन रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर पन्नास फुटांवर एका ग्रामस्थांने रस्ता अडविला होता. संबंधित जागा आपलीच असल्याची त्याची भूमिका असल्याने ही जागा अनेक वर्षांपासून वादात होती. त्यामुळे ग्रामस्थांची मात्र चांगलीच गैरसोय होत होती.
कोंडवे गाव देशात आदर्श बनविण्याचा ध्यास घेतलेले जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे यांनी पुढाकार घेत संबंधित अतिक्रमण केलेल्याशी चर्चा करत गावाच्या विकासात साथ देण्याचे आवाहन केले. रस्त्यावरीलअतिक्रमण हटविल्यास पर्यायाने अतिक्रमण केलेल्यांचा फायदा होणार आहे. तसेच भविष्यात ग्रामपंचायतीतर्फे मोठ्या प्रमाणावर मदत केली जाईल, असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर जागेची मोजणी करुन सोमवारी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटविल्यामुळे गावातील अरुंद रस्त्यावर ताण कमी होणार आहे. तसेच दलितांसाठी येण्या-जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळणार आहे.
आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या कोंडवे ग्रामस्थांचीही साथ मिळत आहे. तलाठी कार्यालयाच्या बाहेरील बाजूस रंगरंगोटी केली असतानाच काही ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने घर परिसराची स्वच्छता करुन रंगरंगोटी करत आहेत. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे प्रबोधन करणारे घोषवाक्यांचे फलक तयार केले आहेत. ते फलक रस्त्याच्या कडेला लावले आहेत. (प्रतिनिधी)
दाखल्यांचे वाटप
प्रांताधिकारी मल्लिकार्जून माने, तहसीलदार राजेश चव्हाण यांनी नुकतीच कोंडवे गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना नवीन शिधापत्रिका, रहिवासी, अधिवास आदी दाखल्यांचे वाटप केले.