मानवता हेच सर्व धर्मांचे मूलतत्त्व
By Admin | Updated: December 25, 2015 00:02 IST2015-12-24T23:10:16+5:302015-12-25T00:02:37+5:30
हम सब एक हैं : सर्वधर्म भाईचारा सभेच्या व्यासपीठावरून अभ्यासकांचा उद्घोष

मानवता हेच सर्व धर्मांचे मूलतत्त्व
सातारा : जगाच्या पाठीवर अनेक धर्म असले, तरी प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व मानवता हेच आहे. दार्शनिकांनी समता आणि प्रेमाचाच संदेश दिला आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर एकमेकांचा द्वेष करणे गैर आहे, असा संदेश सर्व धर्मांच्या अभ्यासकांनी एका व्यासपीठावरून दिला. पैगंबर जयंती, दत्तजयंती आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धर्मांच्या प्रणेत्यांचे विचार एकाच व्यासपीठावरून ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळवून दिली ती मुस्लिम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीने. सर्व धर्मांचे उत्सव एकत्र, शिवाय साने गुरुजींची जयंती असा योगायोग साधून सर्वधर्म भाईचारा सभेचे आयोजन येथील गांधी मैदानावर करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वारकरी संप्रदाय, जैन, बौद्ध धम्म, मुस्लिम अशा सर्वच धर्मांचे मूळ विचार मांडण्याचा प्रयत्न अभ्यासक वक्त्यांनी केला.
जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विजयकुमार जोखे म्हणाले, ‘प्राण्यांचे हवन करणारी यज्ञसंस्कृती संस्कृती नाकारून महावीरांनी अहिंसा स्वीकारली. विषमता हेच दु:खाचे मूळ असल्याचे सांगून सर्व प्राण्यांचा जगण्याचा हक्क मानला. अंधश्रद्धांना विरोध केला. अनेकान्तवादाची मांडणी करून विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. अर्धमागधी या लोकभाषेत विचार मांडून भाषिक क्रांती केली.’
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे यांनी वारकरी संप्रदाय चार पंथांचा मिळून तयार झाल्याचे सांगितले.‘एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा निर्माण होत नसल्याने वारकऱ्यांनीही तो स्वीकारला. हा एकेश्वरवाद आणि स्त्रीस्वातंत्र्याचे तत्त्व पैगंबरांकडून स्वीकारले आहे,’ असे सांगतानाच त्यांनी धर्मप्रसारक म्हणून पत्नीची नेमणूक करणाऱ्या पैगंबरांचे विचार विषद केले.बसवेश्वरांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे विवेचन गुरुमाता नंदाताईंनी केले. ‘कुराण आणि उपनिषदांमध्येही परमात्मा एकच असून, तो निर्गुण-निराकार असल्याचे सांगितले आहे,’ असे त्या म्हणाल्या.शाही मशिदीचे इमाम हाफिज खलील अहमद, बौद्ध धम्माचे अभ्यासक प्रा. हर्ष जगझाप, प्राचार्या मयूरा गायकवाड यांनीही दार्शनिकांचे विचार व्यवहारात आणण्याची गरज प्रतिपादन केली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. सभेला सर्वधर्मीय श्रोत्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
चिमणी आणि माकडाची गोष्ट...
समाजात माणसाने कशासाठी आणि कसे जगायचे हे स्पष्ट करताना गुरुमाता नंदाताई यांनी चिमणी आणि माकडाची गोष्ट सांगितली. झोपडपट्टीतील लोकांनी या दोघांचा सांभाळ केला होता. एकदा झोपडपट्टीला आग लागली आणि चिमणी तिला प्यायला ठेवलेले पाणी चोचीतून आगीवर शिंपडू लागली. माकडाने तिची टर उडवली आणि ‘एवढ्याशा पाण्याने आग विझणार का,’ असा सवाल केला. तेव्हा चिमणी म्हणाली, ‘जेव्हा संपूर्ण झोपड्या जळून खाक होतील, त्यानंतर दोन प्रश्न विचारले जातील. आग कोणी लावली? आणि आग कोणी विझविली? मी दुसऱ्या वर्गात राहू इच्छिते म्हणून चोचीने पाणी शिंपडत आहे.’ हे उदाहरण श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले.