रात्री दहानंतर हॉटेल्स बंद
By Admin | Updated: July 8, 2015 21:54 IST2015-07-08T21:54:22+5:302015-07-08T21:54:22+5:30
जिल्हाधिकारी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

रात्री दहानंतर हॉटेल्स बंद
सातारा : ‘जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणेने आपापसात समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, ढाबे, बिअरबार, परमिट रुम रात्री दहा नंतर बंद करावेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडील शस्त्रे जमा करून घ्यावीत,’ असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांची बुधवारी (दि. ८) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘सर्व तहसीलदार पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणताही हलगर्जी होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित व्यक्तींकडून शस्त्रास्त्रे जमा करावीत. त्याचबरोबर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता म्हणून संवेदनशील गावे, मतदान केंद्रे यांच्यावर सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष ठेवावे.
आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. बैठका घेऊन सूचना कराव्यात. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील हॉटेल, धाबे, मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा नंतर पूर्णपणे बंद करावीत. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शी, निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात,’ अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुम, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, संवेदनशील केंद्रे, मनुष्यबळ व प्रशिक्षण याबाबतचा आढावा
दरम्यान, बुधवारी सकाळी येथील शाहू कला मंदिरात जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित प्रशिक्षण दिले.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे यांसह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रात्री दहानंतर हॉटेल बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन नक्कीच करू. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला हॉटेल व्यावसायिकांचे नेहमीच सहकार्य असते.
- मारूती जगताप,
सातारा, हॉटेल चालक