घरच्यांचे मौन; परक्यांकडून लूट!

By Admin | Updated: December 25, 2014 00:03 IST2014-12-24T23:30:35+5:302014-12-25T00:03:38+5:30

ऊस उत्पादक हतबल : विलंबाचा फायदा घेऊन कवडीमोल दराने खरेदी

Home silence; Outside robbery! | घरच्यांचे मौन; परक्यांकडून लूट!

घरच्यांचे मौन; परक्यांकडून लूट!

नसीर शिकलगार - फलटण  -तालुक्यात या हंगामात उसाचे प्रचंड उत्पादन वाढले असून, हातात कारखानदारांनी पाच पैसे दिले नसताना आपला ऊस कसा गाळपाला जाईल, याची घोर चिंता ऊस उत्पादकांना लागली आहे. याचा फायदा बाहेरील कारखानदारांनी उचलित कवडीमोल दराने व ऊस उत्पादकांकडून लेखी लिहून घेऊन ऊस नेण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादकांना गुलामाच्या पद्धतीने वागविणाऱ्या कारखानदारांबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यात दोन साखर कारखाने असून, या हंगामात उसाचे मोठे क्षेत्र तालुक्यात वाढले गेले आहे. अंदाजे १५ ते १६ लाख टन ऊस या हंगामात उभा आहे. एवढा ऊस गाळप करणे दोन्ही कारखान्यांना शक्य नाही. श्रीराम सहकारी साखर कारखान्याने साठ हजारांच्या आसपास उसाचे गाळप केले असून, न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी या कारखान्याने दीड लाख मे. टन उसाचे गाळप केलेले आहे. दोन्ही साखर कारखान्यांची गाळप करण्याची क्षमता लक्षात घेता, मे अखेर जरी दोन्ही कारखाने सुरू राहिले तरी ते दहा लाख मेट्रिक टनाच्या वर गाळप करू शकणार नाही.
आपला ऊस लवकरात लवकर कसा कारखान्याकडे जाईल व शेत मोकळे करून कसे दुसरे पीक घेता येईल, या विवंचनेत शेतकरी आहे. त्यासाठी दोन्ही कारखान्यांकडे तोडीसाठी ते हेलपाटे घालत आहेत. त्यातच ज्यांच्या ऊस गेलाय त्यांना अद्याप पेमेंट मिळालेला नाही. उसाच्या पहिल्या हप्त्यावरून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आर्थिक तोट्यात सध्या काहीजण आहेत. आपला ऊस कोण नेतंय, यासाठी येथील तालुके व जिल्ह्यातही कारखानदारांच्या पायऱ्या झिजविण्यात ऊसउत्पादक मग्न आहेत. याचा बरोबर फायदा उचलित कात्रित अडकलेल्या ऊस उत्पादकांना काही खासगी कारखानदारांनी ऊस नेण्याचे आमिष दाखवित त्यांच्याकडून लिखित स्वरूपात करारनामा करून घेतला आहे. त्यामध्ये चाळीस किलोमीटरच्या पुढे होणारी ऊस वाहतूक (कमिशनसह) माझे उसाचे पहिल्या अ‍ॅडव्हान्समधून कपात करून घ्यावी. कारखान्याच्या चालू रिकव्हरी बेसनुसार उसाची रिकव्हरी नसल्यास कारखाना नियमानुसार होणारी कपात मला मान्य आहे, असा लेखी करारनामा करून काही खासगी कारखानदारांनी ऊसतोड चालू केली आहे.या करारामुळे खासगी कारखानदारांचे फावणार असून, ते देतील तो दर ऊस उत्पादकांना घ्यावा लागणार आहे. वाहतूक व रिकव्हरीचा विचार करता जर एखाद्या शेतकऱ्याने आपला ऊस बाहेर कारखानदाराला दिल्यास त्याला कारखान्याचा जो दर जाहीर होईल, त्याच्या चारशे ते साडेचारशे रुपये कमी दर मिळणार आहे. कारखानदारांकडून ही शुद्ध फसवणूक होत असून, आर्थिक विवंचनेत अडकलेला व आपला ऊस कसा जाईल, या चिंतेत असणाऱ्या ऊस उत्पादकांना पर्यायच राहिला नाही.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये उसाच्या प्रचंड उत्पादनामुळे लढण्याची क्षमता राहिलेली नाही. कारखानदार सांगतील तसे त्यांना वागावे लागत आहे. त्यामुळे कोणाकडूनही दराबाबतही आंदोलनाची भाषा नाही की, आवाज नाही. आपला ऊस कसा जाईल, यासाठीच त्यांचा संघर्ष सुरू आहे.
ऊस उत्पादकांच्या हतबलतेचा फायदा घेत कवडीमोल दराने लिखित स्वरूपात त्यांचा ऊस नेणाऱ्या खासगी कारखानदारांबद्दल जनतेत मात्र संतप्त प्रतिक्रिया उमठत आहे.

Web Title: Home silence; Outside robbery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.