साताऱ्याच्या 'शाही दसरा' सोहळ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 18:49 IST2017-09-30T18:46:13+5:302017-09-30T18:49:02+5:30
साताऱ्यात शनिवारी सायंकाळी 'शाही दसरा' उत्साहात साजरा झाला.

साताऱ्याच्या 'शाही दसरा' सोहळ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन
सातारा - साताऱ्यात शनिवारी सायंकाळी 'शाही दसरा' उत्साहात साजरा झाला. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरा ओळखला जाणारा हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांनी गर्दी केली होती. यावेळी सार्वजनिक मंडळांच्या देवींची मिरवणूकही निघाली. त्यानंतर अनेक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात झालेल्या भवानी तलवार पूजन सोहळ्याला राजमाता कल्पनाराजे, उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे, चिरंजीव वीरप्रतापसिंहराजे आधी राजघराण्यातील मंडळी उपस्थित होती.
पूजन केल्यावर ही भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथे आणण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताऱ्यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे शास्त्रशुद्ध पूजन उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंह राजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती शास्त्रींनी पौरोहित्य केले. सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.