साताऱ्यात वर्षातील उच्चांकी तापमान; पूर्व भागात अंगाची लाहीलाही 

By नितीन काळेल | Published: April 15, 2024 06:47 PM2024-04-15T18:47:50+5:302024-04-15T18:48:10+5:30

मजूर वर्गाला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका

Highest temperature of the year in Satara; A record of 40.1 degrees | साताऱ्यात वर्षातील उच्चांकी तापमान; पूर्व भागात अंगाची लाहीलाही 

साताऱ्यात वर्षातील उच्चांकी तापमान; पूर्व भागात अंगाची लाहीलाही 

सातारा : जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून, सोमवारी साताऱ्यात पारा ४०.१ अंश नोंद झाला. या वर्षातील हे उच्चांकी तापमान ठरले. तर पूर्व भागात कडक उन्हाळा असल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.

जिल्ह्यात मार्च महिना सुरू झाल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ३९ अंशांवर पारा पोहोचला होता. यामुळे यंदा उन्हाळा लोकांना असह्य करणार असेच चित्र होते. हा अंदाज एप्रिल महिना सुरू झाल्यापासून खरा ठरू लागला आहे. कारण मागील १५ दिवसांत जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. त्यातच सातारा शहराचा पारा तर बहुतांशीवेळा ३९ अंशावरच राहिला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिकांना हैराण होण्याची वेळ आली आहे, तर दुपारच्या सुमारास उन्हाळी झळा सोसवेनात अशी स्थिती आहे.

असे असतानाच सोमवारी जिल्ह्यातील पारा वाढून ४० अंशाच्याही पार गेला. सातारा शहरात ४०.१ अंश तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले आहे, तर सोमवारी दुपारी सूर्य आग ओकत असल्यासारखी स्थिती असल्याने सातारा शहरात लोकांची वर्दळ कमी झाली होती. तसेच तुरळक प्रमाणात वाहने रस्त्यावरून धावत होती.

दरम्यान, सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पारा वाढलेला आहे. कमाल तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे नागरिकांना घरात बसण्याची वेळ आली आहे, तर शेतकरी सकाळच्या सुमारास कामे उरकून घेत आहेत. मजूर वर्गाला तर या कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका बसू लागला आहे.

सातारा शहरातील कमाल तापमान असे :

दि. १ एप्रिल ३९, २ एप्रिल ३९.२, ३ एप्रिल ३९.२, ४ एप्रिल ३९.८, ५ एप्रिल ३९.७, दि. ६ एप्रिल ३९.७, ७ एप्रिल ३८.८, ८ एप्रिल ३८.७, ९ एप्रिल ३९.२, दि. १० एप्रिल ३९.१, ११ एप्रिल ३९.२, १२ एप्रिल ३६.७, १३ एप्रिल ३७.९, १४ एप्रिल ३९.६ आणि दि. १५ एप्रिल ४०.१

Web Title: Highest temperature of the year in Satara; A record of 40.1 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.