सातारा @४०.७ अंश; जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे लाहीलाही
By नितीन काळेल | Updated: April 17, 2025 19:32 IST2025-04-17T19:32:26+5:302025-04-17T19:32:52+5:30
वर्षातील उच्चांकी तापमान : तीन दिवसांपासून उष्णतेची लाट

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सलग तीन दिवसांपासून बहुतांशी भागातील पारा ४० अंशावर आहे. गुरूवारी तर सातारा शहराचा पारा ४०.७ अंश नोंद झाला. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. तर उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पारा वाढत गेला आहे. सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाळी झळा तीव्र झाल्या आहेत. कडाक्याचे ऊन आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक हवालदिल आहेत. त्यातच मागील पाच दिवसांपासून कमाल तापमानात आणखी वाढ झाली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा पारा ४० अंशावर राहिला आहे.
सातारा शहरातही तीन दिवस ४० अंशावर तापमान नोंद झाले. गुरूवारी तर ४०.७ अंश तापमानाची नोंद झाली. असे असलेतरी महाबळेश्वरचा पारा अजूनही ३५ अंशाच्या आतच आहे. यामुळे महाबळेश्वर-पाचगणीसारख्या ठिकाणी अजुनही उन्हाची तीव्रता वाढलेली नाही.
जिल्ह्यात उन्हाचा कडाका असल्याने शहरातील बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.
दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडत आहेत. तसेच बाजारात कुठेतरी नागरिक दिसतात. तर ग्रामीण भागात सकाळी ११ नंतर नागरिक आपापले घर गाठत आहेत. त्यामुळे गावागावांतही शुकशुकाट जाणवत आहे. उष्णतेची लाट आल्याने शेतकऱ्यांनीही दुपारची कामे करणे टाळले आहे.