सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी सातारा शहराचा पारा ४०.९ नोंद झाला. तर माण आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. त्याचबरोबर थंड हवेचे महाबळेश्वरही तापले असून यंदा प्रथमच पारा ३४ अंशावर गेला आहे. यामुळे अंगाची काहिली होऊ लागली आहे.जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे बहुतांशी भागातील कमाल तापमान ३९-४० अंशावर राहत आहे. त्यातच जिल्ह्याचा पश्चिम भाग जंगलाचा आणि समृध्द पट्टा असलातरी तेथेही पारा वाढत आहे. त्यामुळे सातारा शहरात एप्रिल महिन्यातच आतापर्यंत सहावेळा कमाल तापमान ४० अंशावर गेले आहे. चार दिवसांपूर्वी साताऱ्यात ४०.७ अंश तापमानाची नोंद झालेली. तर मंगळवारी ४०.९ अंश तापमान राहिले. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. त्याचबरोबर कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावरील वर्दळ एकदम कमी झाली होती. बाजारपेठेच्या ठिकाणीही गर्दी नव्हती. या उन्हाची परिणाम नागरिकांवर चांगलाच होत आहे. कारण उकाड्याने जीव कासावीस होऊ लागला आहे. यामुळे नागरिक बगीच्या, झाडांचा आसरा घेताना दिसत आहेत.
दुष्काळी तालुक्यातील अनेक भागात उच्चांकी तापमानमाण, खटाव आणि फलटण या दुष्काळी तालुक्यातील पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठवड्यात माण आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमान ४१ अंशावर गेले होते. पण, मंगळवारी ४२ अंशावर पारा नोंद झाला. कारण, गावागावांत उष्णतेची लाट दिसून आली. घराबाहेर पडले की अंगाची काहिली होत होती. सायंकाळी पाच वाजलेतरी उकाडा कमी झाला नव्हता. यानिमित्ताने दुष्काळी तालुक्यातील अनेक भागात या वर्षात प्रथमच उच्चांकी तापमान दिसून आले.