वीटभट्ट्यांमुळे आरोग्य धोक्यात!
By Admin | Updated: February 9, 2015 00:40 IST2015-02-08T23:49:27+5:302015-02-09T00:40:20+5:30
अवैध धंद्यात वाढ : फलटण शहर व तालुक्यात रस्त्याच्या कडेला उभारताहेत भट्ट्या

वीटभट्ट्यांमुळे आरोग्य धोक्यात!
फलटण : ‘फलटण शहर व तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायात वाढ होत आहे. आता तर रस्त्याच्या कडेला अनधिकृरीत्या वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावर उभारल्या जात आहेत. वीटभट्ट्यांमुळे होत असलेल्या प्रदुषणामुळे वाटसरूंबरोबरच तेथे काम करत असलेल्या कामगारांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
फलटण शहर व तालुक्यात कुचकामी प्रशासनामुळे अवैध व्यवसायाची वानवा नाही. चोरटी वाळू वाहतूक, अवैध वृक्षतोड, अनधिकृत क्रशर याच्याबरोबरच आता कोणताही परवानगी न घेता वीटभट्ट्यांचे मोठे जाळे फलटण शहर व तालुक्यात पसरत चालले आहे. शहरात अनेक वीटभट्ट्या आहेत. तशाच ग्रामीण भागातही रस्त्याच्या कडेला वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यांना परवानगी नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नाही, अशा परिस्थितीत उभारलेल्या वीटभट्ट्यांमुळे पर्यावरणाची हानी होऊ लागली आहे. वीटभट्ट्या उभारताना जनतेची कशी गैरसोय होईल, याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते. वीटभट्ट्या शेकण्यासाठी टायर, जळके आॅईल, खराब वायरी, तारा आदींचा वापर केला जात आहे. यातून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. तसेच टायरी जळत असल्यामुळे घाण वास येत असल्याने नाक हातात धरून जावे लागते.
डोळ्यात धूर गेल्यास डोळ्यांची आग होतेच; पण नाका तोंडात धूर गेल्यास खोकलाही येत आहे. धुरामुळे व वासामुळे पर्यावरणाची हानी होतेच; पण वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगारही आजारपणाच्या विळख्यात सापडले आहे. धूर व वासामुळे अनेकांना दम्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीटभट्ट्यांभोवती वावरत असताना हेवेतील आॅक्सिजन कमी होण्याबरोबरच कार्बनडायआॅक्साईड जास्त प्रमाणात शरीरात जात असल्याने विविध कामगारांना अनेक व्याधी बळावत चालल्या आहेत. (प्रतिनिधी)
जाचक अटींची पर्वा कुणाला
वीटभट्ट्या सुरू करण्याची परवानगी घेताना अनेक कागदपत्रे जमा करावे लागतात. त्यासाठी जाचक अटी असल्या तरी त्याची कोणालाच पर्वा नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोणालाही न जुमानता अनेकांनी वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. शासकीय यंत्रणेबरोबरच प्रदूषण व पर्यावरण विभागही याकडे कानाडोळा करत आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींमधून केला जात आहे.
वीटभट्टीच्या धुरामुळे श्वसनाचे अनेक आजार होत चालले आहेत. याचा धूर आरोग्यास हानिकारक असण्याबरोबरच तेथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्यही बिघडत आहेत. वीटभट्टीभोवती वावरणेही धोकादायक आहे. नेहमी आरोग्य तपासणी करण्याबरोबरच धूर आणि वास या संबंधित प्रतिबंधक उपाययोजना करावी.
- डॉ. सुभाष गुळवे, फलटण