रानभाज्यांच्या संवर्धनातून जपणार आरोग्य संपदा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:58+5:302021-08-14T04:43:58+5:30
खंडाळा : निसर्गसंपदा ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. जंगलात आणि रानात उगवणाऱ्या अनेक प्रकारच्या भाज्या हीच पूर्वीची खाद्यसंस्कृती होती. त्यामुळे ...

रानभाज्यांच्या संवर्धनातून जपणार आरोग्य संपदा...
खंडाळा : निसर्गसंपदा ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. जंगलात आणि रानात उगवणाऱ्या अनेक प्रकारच्या भाज्या हीच पूर्वीची खाद्यसंस्कृती होती. त्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहत होते. आधुनिक युगात रानभाज्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अनेक भाज्यांचे वाण नष्ट झाले आहेत; परंतु रानभाज्या या आरोग्यदायी असल्याने त्यांच्या संवर्धनातून लोकांची आरोग्य संपदा वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातर्फे खंडाळा येथे रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सुनील पवार, सुरेश डोईफोडे, समीर चव्हाण उपस्थित होते.
खंडाळा पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे वाण पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक भाज्यांचे उपयोग व करण्याच्या पद्धती याविषयी माहिती दिली जात होती. दिवसभरात अनेकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रेश्मा हाडंबर, सुनील लिम्हण, रामचंद्र पाडळे, प्रमोद जाधव, अर्चना भरगुडे या शेतकऱ्यांचा रानभाजी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
(कोट..)
जंगलात आढळणाऱ्या रानभाज्या आरोग्यवर्धक आहेत. काळाच्या पडद्याआड जाणारा हा अनमोल खजिना लोकांसाठी उपयोगी आहे. त्याची माहिती व उपयोग प्रसार करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने आत्मा अंतर्गत काम सुरू आहे. नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवून अनेक रोगांपासून सुटका करण्यासाठी रानभाज्या आणि सेंद्रिय उत्पादने फलदायी ठरू शकतात.
- समीर चव्हाण, समन्वयक, आत्मा सातारा
(चौकट)
विविध भाज्यांचा समावेश...
रानभाज्या महोत्सवातून लोकांना प्रत्यक्ष भाज्या पाहता आल्या. यामध्ये टाकळा, भाळगा, भारंगी, ढेसा, कुरडू, पिंपळ, उंबर, केना, तोंडली, करटोली, बाबू, घोळभाजी, तांदुळजा, माठ, लाल माठ, राजगिरा, आळू, पाथरी, अंबाडा, आघाडा, गूळवेल, चिवळ, कवठ, पानांचा ओवा, शेवगा, दिंडा, काटेमाट अशा विविध भाज्यांचा समावेश होता.
फोटो आहे..१३ खंडाळा