नुकसान प्रस्ताव पाठविण्याची घाई; मदतीसाठी मात्र, दिरंगाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:03+5:302021-08-25T04:44:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. ...

नुकसान प्रस्ताव पाठविण्याची घाई; मदतीसाठी मात्र, दिरंगाई !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा एक-दोन नव्हे तर ८०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यामध्ये ८८२५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली असून ४९०५१ शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. या शेतकऱ्यांचे साडेसात कोटींहून अधिक तर शेतजमिनीचे ४१२९ हेक्टरचे जवळपास १३ कोटींचे नुकसान झालेले आहे. मदतीसाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठविले असलेतरी निधी अजून आलेला नाही.
जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली होती. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर भागात धुवाँधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. जमिनीवर गाळ, वाळू, दरड आली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड आणि पाटण तालुक्यातील पीक व जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये ८८२५.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर बाधित शेतकरी संख्या ४९०५१ आहे. तर ७ कोटी ५६ लाख ३९ हजार रुपयांचे पीक नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आलेली आहे.
अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पीक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील १९७५६ शेतकऱ्यांचे ३६३७ हेक्टरवरील पिकांचे २ कोटी ३७ लाखांचे नुकसान झालेले आहे. तर कऱ्हाड तालुक्यात १४३०९ शेतकऱ्यांच २३९१ हेक्टर पिकांचे २ कोटी ९५ लाखांचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पिकांचे आणि जमिनीचे नुकसान झालेले आहे. पाटणमध्ये भात आणि नाचणी पिकांची हानी झाली आहे.
जावळी तालुक्यात भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे. कऱ्हाड तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही पिकांचे नुकसान झाले आहे. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने पीक आणि जमीन नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले. त्यानंतर मदतीबाबतचे प्रस्ताव शासनस्तरावरही पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही मदतीचा निधी जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\