सुगीचे दिवस ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:22+5:302021-06-22T04:26:22+5:30

कृष्णाकाठी सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत.आता कोणासाठी ही शेतीतील कामाची सुगी आहे तर कोणासाठी ही निवडणुकीतील प्रचाराची सुगी आहे ...

Harvest days ..! | सुगीचे दिवस ..!

सुगीचे दिवस ..!

कृष्णाकाठी सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत.आता कोणासाठी ही शेतीतील कामाची सुगी आहे तर कोणासाठी ही निवडणुकीतील प्रचाराची सुगी आहे एवढंच! आता या दोन्ही सुगीमध्ये जो-तो व्यस्त दिसत असून प्रत्येकाच्या सोयीने या सुगीची चर्चा सुरू आहे.

जून महिन्यात पावसाची चाहूल लागते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सुगीचे दिवस ठरतात. सध्या पावसाचे आगमन झाले असून सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जूनला होत आहे. त्याचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही भलतेच सुगीचे दिवस आलेले दिसतात पण दोन्हीमध्ये व्यस्त असणाऱ्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू दिसतोय. कारण ‘कार्यकर्ते दारात, शेतकरी मतदार रानात’ अशी परिस्थिती दिसत आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्यांत कृष्णा सहकारी साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र आहे. नेहमीप्रमाणेच कृष्णाच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कारखान्यात दुरंगी लढत अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रत्यक्षात तिरंगी लढत समोर आली आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्याविरोधात काँग्रेसच्या डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल तर राष्ट्रवादीच्या अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे तिरंगी लढत असली तरी चुरशीची होणार हे स्पष्ट दिसत आहे.

वास्तविक कोरोना संकट असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार करताना सर्वांनाच मोठ्या अडचणी येत आहेत. सभा, बैठका, पदयात्रा याला परवानगी मिळवणे कठीण झाले आहे. त्यातूनही त्याचे आयोजन केले तर अपेक्षित प्रमाणात सभासद मतदार तेथे उपस्थित राहत नाही. घरोघरी जाऊन सभासदांची भेट घेणे याशिवाय दुसरा पर्याय उमेदवारांसमोर नाही. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्याने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता पूर्वीप्रमाणे ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायला कार्यकर्ता तयार नाही’ त्यामुळे उमेदवार आणि नेत्यांना कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागत आहे. कार्यकर्त्यांना फिरायला चार चाकी गाड्या अन्‌ दिवसाच्या खर्चासाठी बिदागीची सोय करावी लागत आहे. पण या साऱ्याचा फायदा काय होतोय हे निकालानंतरच समजेल. कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचायला मतदार कुठे घरात जागेवर आहे.

शेतकरीराजाचीही सध्या सुगी सुरू आहे. शेतीच्या मशागती, पेरणीची त्यांची धांदल आहे. त्यामुळे तो रानात दिसतोय. शेती ही लहरी निसर्गावर अवलंबून आहे. गत आठवड्यात कृष्णा काठावर ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे काहींची मशागतीची कामे खोळंबली आहेत तर ज्यांच्या मशागती झाल्या आहेत. त्यांच्या पेरण्या बाकी आहेत. सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे ज्या शेतात घात येईल तेथे पेरणी सुरू आहे; पण येथे मजुरांची वानवा असल्याने स्वतः शेतकरी राबताना दिसतोय. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारकडे त्याचे तेवढ्या प्रमाणात लक्ष दिसत नाही.

सध्या मात्र गावागावांत शेतकरी त्याच्या सुगीची चर्चा करतोय तर राजकीय कार्यकर्ते त्यांच्या सुगीचा आनंद घेताना दिसतात. आता कोणत्या सुगीचा कोणाला किती अन कसा फायदा होतोय हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागेल आणि हो, सुगीचे दिवस हे थोडेच असतात बरं!

प्रमोद सुकरे, कराड

Web Title: Harvest days ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.