‘हर हर महादेव’ने दुमदुमली वाई!
By Admin | Updated: January 15, 2015 23:28 IST2015-01-15T22:26:17+5:302015-01-15T23:28:43+5:30
हजारो तरुणाई सहभागी : उत्स्फूर्त प्रतिसादात शिवप्रतिष्ठानच्या गटकोट मोहिमेस प्रारंभ

‘हर हर महादेव’ने दुमदुमली वाई!
वाई : राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या युवकांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठानच्या गडकोट मोहिमेस वाई शहरातील द्रवीड हायस्कूलच्या मैदानावरुन गुरुवारी प्रारंभ झाला. या मोहिमेत सत्तर हजार तरुण सहभागी झाले असून ही मोहीम व्याजवाडी येथे पोहोचली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वाईनगरी दुमदुमून गेली.
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) व नगरविकास मंत्री डॉ़ रणजित पाटील यांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, निमंत्रक विजयाताई भोसले, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ शेलार, ‘भाजप’चे प्रदेश सदस्य अविनाश फरांदे, वाईचे नगराध्यक्ष भुषण गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, सुतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक हुंबरे, प्रांतांधिकारी रवींद्र खेबुडकर, मुख्याधिकारी आशा राऊत, नगरसेवक अनिल सावंत, महेंंद्र धनवे, नंदकुमार खामकर, पोपटशेट ओसवाल उपस्थित होते़
मंत्री डॉ़ पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्याच्या दृष्टीने तीस वर्षे गडकोट मोहीमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला पादाक्रांत करून किल्ल्याची डागडुजी व साफसफाई अव्याहतपणे करण्याचा वसा घेतलेल्या संभाजीराव भिडे गुरूजींचे कार्य अखंडपणे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.’
यावेळी इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर, बंडोपंत राज्योपाध्ये, पोपटलाल ओसवाल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भाषणे झाली.
संदीप जायगुडे, संतोष काळे, सागर मालुसरे, दिनेश खैरे, सागर चौधरी, आप्पा मालूसरे, मुकुंद पोळ, भैया सकुंडे, अमित सोहनी आदींनी परिश्रम घेतले़
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर-हर महादेव,’ च्या जयघोषाने वाईनगरीसह परिसर दूमदुमण गेला होता. (प्रतिनिधी)
रांगोळ्यांनी स्वागत
४गडकोट मोहीमेसाठी महाराष्ट्रासह बेळगांवमधून सुमारे साठ ते सत्तर हजार तरुण सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण वाई शहर शिवमय झाले होते़ जागो-जागी रांगोळया काढल्या होत्या. गडकोट मोहीमेची सुरूवात द्रविड हायस्कुलच्या मैदानावरून करण्यात आली. ती पुढे सिद्धनाथवाडी मार्गे-महागणपती पुलावरून-गंगापुरी शाहीर चौकातून - वाई नगरपालिका मार्गे-भाजी मंडई - दातार दवाखाना-रविवारपेठ चावडी चौक मार्गे-किसनवीर चौकातून कृष्णापूलावरून-सोनगिरवाडीतून बावधननाका मार्गे बावधन गावातून व्याजवाडी मुक्कामी गेली.
किल्ल्यांच्या संर्वधनासाठी कटिबद्ध : पाटील
‘गडकोट मोहीमेच्या माध्यमातून संभाजीराव भिडे गुरूजींच्या संस्कारातून देशभक्त तरूण पिढी निर्माण होत आहे. त्यांच्या विचाराचेच महाराष्ट्रातील सरकार आहे. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे,’ असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र एकसंधच हवा : संभाजीराव भिडे
हा महाराष्ट्र एकसंध ठेवून देशात अग्रगण्य बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहीले पाहीजे. महाराष्ट्राचे तुकडे झालेले सहन केले जाणार नाहीत. यासाठी गडकोट मोहीमेच्या माध्यमातून निर्व्यसनी व सशक्त पिढी निर्माण करण्याचे कार्य आहोरात्रपणे चालू आहे. यासाठी शासनाचे सहकार्य अपेक्षित आहे़
- संभाजीराव भिडे