प्रसूती रजेचा आनंद आता द्विगुणित !
By Admin | Updated: December 17, 2015 23:02 IST2015-12-17T22:41:27+5:302015-12-17T23:02:27+5:30
मंथ टू मंथ पगार : शिक्षकांना दिलासा, जिल्हा प्राथमिक संघाच्या पाठपुराव्याला यश

प्रसूती रजेचा आनंद आता द्विगुणित !
सातारा : महिला शिक्षकांच्या प्रसूती रजेचे रजेच्या कालावधीतील पगार न थांबवता दरमहा देण्यात यावा, या मागणीला शासकीय स्तरावरून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात प्रसूती काळात रजेवर गेलेल्या महिला शिक्षकांना दरमहा पगार मिळणार आहे.सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने नुकतेच आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद शिक्षण सभापती अमित कदम आणि शिक्षणाधिकारी पूनिता गुरव यांच्याकडे सादर केला होते. सध्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षकांना सहा महिने प्रसूती रजा मंजूर करण्यात आली आहे. प्रसूती रजेवर असलेल्या शिक्षकांना कामावर हजर झाल्यावर सहा महिन्यांचा पगार एकदम जमा केला जात होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये आर्थिक नियोजन कोलमडून पडते. कित्येकदा काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्यामुळे त्याचे व्याज आणि दंड भरण्याची वेळ या शिक्षकांवर येते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढता यावा म्हणून शिक्षक संघाने प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आले असून, शिक्षणाधिकारी पूनिता गुरव यांनी सकारात्मक निर्णय घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना दिलासा दिला आहे. अनेक घरांमध्ये शिक्षकांचे आर्थिक नियोजन निश्चित केले जाते. एकाचा पगार खर्च करण्यासाठी तर दुसऱ्याचा गुंतवणुकीसाठी अशी पगाराची विभागणी केलेली सर्रास पाहायला मिळते. बहुतांशदा पतीचा पगार घर खर्चासाठी उपयोगात आणला जातो, तर पत्नीच्या पगारात बँकेचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाच्या तरतुदी, विम्याचे हप्ते, गाडीचे हप्ते देण्याची तजवीज केली जाते. इतके दिवस महिला शिक्षकांनी प्रसूती रजा घेतली की त्यांचे उत्पन्न पूर्णपणे थांबत होते. नोकरीवर हजर झाल्यानंतरच त्यांना एकदम सर्व पगार हाती मिळत होता. पण यामुळे सहा महिन्यांची आर्थिक घडी विस्कटत होती. जिल्ह्यातील अनेक शिक्षक जोडप्यांचा हा प्रश्न होता. प्रसूती दरम्यान, आई किंवा बाळाच्या प्रकृतीत काही कमी अधिक झाले तर हाताशी असलेले सगळे पैसे खर्च करून इतरांकडे पैसे मागण्याची वेळ या शिक्षकांवर येत होती. प्रसूती रजेचा पगार महिन्याला मिळावा अशी अनेकांची मागणी होती.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय सकारात्मक पध्दतीने निकालात काढल्यामुळे शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख सिध्देश्वर पुस्तके, जिल्हाध्यक्ष मुच्छिंद्र मुळीक, शिक्षक बँकेचे चेअरमन बलवंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित कदम आणि पूनिता गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बोराटे, व्हा. चेअरमन मोहन निकम, राजेंद्र तोरणे, प्रवीण घाडगे, सुनील खंडाईत, चंद्रकांत आखाडे, संतोष जगताप, प्रमोद देशमुख, डी. वाय. शिंदे आदी मान्यवर उपस्थितीत होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांचा अर्धा तास झाला कमी!
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ साडेदहा ते पाच आणि शनिवारी सकाळी साडेसात ते अकरा अशी करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अमित कदम यांनी मान्यता दिली. पूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांना सकाळी दहा वाजता येणे बंधनकारक होते. शनिवारी तर सकाळी साडेसात वाजता येऊन शिक्षकांना दुपारी साडेअकरा पर्यंत थांबावे लागत होते.
निर्णयाचे शिक्षकां-कडून जल्लोषी स्वागत
शाळांच्या अतिरिक्त वेळा आणि प्रसूती काळातील पगार नियमित करणं या शिक्षकांच्या प्रमुख दोन मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पडल्या होत्या. शिक्षक संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या दोन्ही मागण्या मान्य झाल्याने या निर्णयाचे शिक्षकांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. प्रसव रजेवर जाणाऱ्या महिला शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत करत, ‘आता आमची सुटी सुखाची जाईल’, अशी प्रतिक्रिया नोंदविली.