तांबवेत आढळलेले हातबॉम्ब १९६१ साली बनविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:09+5:302021-05-23T04:40:09+5:30
तांबवे येथील कोयना नदीच्या पात्रात सोमवारी, दि. १७ सकाळी मासेमारी करणाऱ्या तीन युवकांच्या गळाला प्लास्टिकची पिशवी लागली. युवकांनी उत्सुकतेपोटी ...

तांबवेत आढळलेले हातबॉम्ब १९६१ साली बनविले!
तांबवे येथील कोयना नदीच्या पात्रात सोमवारी, दि. १७ सकाळी मासेमारी करणाऱ्या तीन युवकांच्या गळाला प्लास्टिकची पिशवी लागली. युवकांनी उत्सुकतेपोटी पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये तीन जिवंत हातबॉम्ब आढळून आले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. हातबॉम्ब सैन्य दलातील असून ‘फॅक्टरी मेड’ असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्यावेळीच दिली होती. त्यामुळे कऱ्हाड तालुका पोलिसांनी याबाबत भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी-पुणे येथील आयुध निर्माण फॅक्टरीशी पत्रव्यवहार केला. याशिवाय पुणे एटीएस पथकानेही खडकीच्या दारूगोळा फॅक्टरीतील जुने रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू केले. हॅण्ड ग्रेनेड निर्मितीच्या बॅच नंबरनुसार ते हातबॉम्ब १९६१ साली तयार झाले असल्याची माहिती एटीएस पथकाच्या हाती लागली आहे. कोयना नदीत सापडलेले हातबॉम्ब १९६१ सालातील बनावटीचे असतील, तर ते एवढे दिवस कुठे होते, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कोणताही दारूगोळा तयार करताना त्यावर सीरियल क्रमांक आणि निर्मितीचे वर्ष नमूद असते. त्यावरून स्फोटकाचा प्रकार, निर्मितीची माहिती, वितरित झालेली तारीख, ते स्फोटक कोणत्या विभागाला आणि कशासाठी वितरित केले, याची नोंद ठेवली जाते. त्यामुळे १९६१ सालातील निर्मितीचे हातबॉम्ब इतके दिवस कुठे होते, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
- चौकट
घाटकोपरच्या कापड दुकानदाराची चौकशी
बॉम्ब ठेवलेली प्लास्टिकची पिशवी कपड्याच्या दुकानातील असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यानुसार पिशवीवरील दुकानाच्या नावावरून एटीएस आणि पोलिसांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये जाऊन त्या कपड्याच्या दुकानाचा शोध घेतला. दुकानदाराकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली; परंतु त्याच्याकडून ठोस माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.