गुजरातचे फुगे साताऱ्याच्या रस्त्यांवर!

By Admin | Updated: January 10, 2015 00:22 IST2015-01-09T23:13:58+5:302015-01-10T00:22:40+5:30

चिमुकल्यांमध्ये क्रेझ : पंजाबी कुटुंबांचे क्रेझी मार्केटिंग!

Gujarat's buds in the Satara streets! | गुजरातचे फुगे साताऱ्याच्या रस्त्यांवर!

गुजरातचे फुगे साताऱ्याच्या रस्त्यांवर!

कोंडवे : मार्केटिंगच्या आजच्या युगात वस्तू खपवण्याची कला ज्याच्याकडे असेल, तो काहीही विकू शकतो. त्यात भाषा आणि प्रांताचा कोणताच अडसर येत नाही हेच खरे! गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी उंचच उंच फुगे घेऊन वाहनांच्या गर्दीतून दुडूदुडू पळणारी पावले सगळ्यांनी पाहिली. गुजरातहून आलेल्या या फिरस्त्यांना आता निम्मा सातारा ओळखू लागला आहे.
मंगळवारी सकाळी शहरात विशेषत: एसटी स्टॅण्ड परिसरात आपल्या उंचीएवढी उंच फुगे हातात घेऊन धावणारी मुलं अनेकांनी पाहिली. इतका मोठा फुगा म्हणत गर्दीतील अनेकांचे या फुग्याकडे लक्ष जात होते. ज्यांच्या गाडीत लहानगे होते त्यांना तर फुगे घेण्याशिवाय काही पर्यायच उरला नव्हता.
सकाळी आठपासून सुरू होणारा यांचा व्यवसाय थेट संध्याकाळी सात वाजता बंद होतो. ही मुलं आणि पालक दुपारचे जेवणही आळीपाळीने करतात.
पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या या फिरस्त्यांना साताऱ्याची भुरळ पडली आहे. ‘इथली माणसं मायाळू आहेत. प्रत्येकजण बसवून चहा पाणी विचारतो. मुलांशी अदबीने वागतात. तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलंय. धंदा चांगला असेल तर हे शहर लवकर सोडणार नाही,’ असे जस्मत
सांगतात. (प्रतिनिधी)

दिवसाकाठी ७००-७५०
गुजरात येथील अहमदाबाद पासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘नडियाड’ या गावातून जस्मत सिंग आपल्या कुटुंबासह आले आहेत. सकाळी आठपासून संध्याकाळी पाचपर्यंत कुटुंबातील पाचजण फुगे विकण्याचा व्यवसाय करतात. यातून त्यांची ७००-७५० रुपयांची सरासरी कमाई होते. दुपारच्या वेळेतही अविश्रांत काम केल्यानंतर मिळालेली कमाईही एकत्र करून त्या रकमेतून दोन वेळच्या अन्नाची सोय केली जाते. आपला सगळा संसार एसटी स्टॅण्ड परिसरात एका कोपऱ्यात टाकून हे अख्खं घरदार रस्त्यावर फिरते ते फुगे विकण्यासाठी...!


मोबाईल चार्जर देण्याची माणुसकी
जग बदलतेय तशी माणसांच्या माणुसकीचे नियमही बदलत चालले आहेत. पूर्वी अन्नदान करणाऱ्याला माणुसकी म्हणायचे तर आता मोबाईल चार्जर देणाऱ्यांमध्ये जस्मतला ‘इन्सानियत’ दिसते. याविषयी ते सांगतात, ‘गावाकडे माझी दोन मुले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल आहे. आमच्याकडे चार्जर नसल्यामुळे खूप अडचण होती. साताऱ्यातील लोक या बाबतीतपण दिलदार आहेत. कोणालाही थोड्या वेळासाठी चार्जर मागितला तर लोक देतात. कित्येक जणांनी मोबाईल चार्जिंगला लावा आणि तुम्ही निर्धास्त होऊन धंद्याला जावा’.

Web Title: Gujarat's buds in the Satara streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.