द्राक्षाला ना उसाला; कोल्हा महाग घासाला!
By Admin | Updated: April 3, 2015 00:36 IST2015-04-02T23:24:41+5:302015-04-03T00:36:04+5:30
उपाशीपोटी शिवारात ‘कोल्हेकुई’ : शाकाहारी की मांसाहारी हाच प्रश्न; शिकारी प्राण्याची अन्नान्न दशा; पोटासाठी वाढला नागरी वस्तीत वावर

द्राक्षाला ना उसाला; कोल्हा महाग घासाला!
संजय पाटील - कऱ्हाड -‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ ही म्हण आणि ‘उसाला लागल कोल्हा’ हे गाणं सर्वपरिचित; पण भरल्या शिवारात वावरणाऱ्या या कोल्ह्याची सध्या अन्नान्न दशा सुरू आहे. शिवारात भूक भागत नसल्याने त्याची पावले नागरी वस्तीकडे वळतायत. दारोदारी तो अन्नासाठी भटकतोय आणि या भटकंतीत उरलं-सुरलं त्राणही गमावतोय. कऱ्हाडनजीकच्या करवडी कॉलनीत गुरुवारी सकाळी भुकेने व्याकूळ झालेला कोल्हा आढळून आला. खपाटीला गेलेलं पोट आणि खोल गेलेल्या डोळ्यांसह हाडामासाचं शरीर चार पायांवर सावरत हा कोल्हा एका घराच्या दरवाजात उभा राहिलेला. नागरिकांनी त्याला पाहिलं आणि काही क्षणातच तो जमिनीवर कोसळला. कोल्ह्याची ही दशा समजताच प्राणीमित्रांच्या काळजाचा ठोका चुकला. शिवारात सर्वत्र वावरणारा हा प्राणी अन्नपाण्याला एवढा महाग का? या प्रश्नानं वनविभागही अस्वस्थ झाला.
वास्तविक, गावोगावच्या शिवारात अनेक लहान-मोठे प्राणी आढळतात. रानडुक्कर, सायाळ, घोरपड, ससा यांचा शिवारातला वावर रोजचाच; पण कधीकधी झुबकेदार शेपूट, भुरकट तपकिरी रंग आणि उभ्या कानांचा कोल्हा उसाच्या फडातून हळूच डोकावतो. शेतकऱ्यांचं तो लक्ष वेधून घेतो. ज्याठिकाणी माणसांची वर्दळ जास्त तेथे याचा वावर कमी. माणसांच्या सावलीपासूनही हा प्राणी सहसा दूरच राहतो. माणसांचा मागमूस जरी लागला तरी तो तेथूनच पळ काढतो. दिवसभर उसाच्या फडात किंवा निर्जनस्थळी लपून राहणे आणि रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडणे, असा कोल्ह्याचा दिनक्रम; पण सध्या रात्रीच्या वेळी बाहेर पडूनही त्याला उपाशीपोटी ‘कोल्हेकुई’ द्यावी लागत असल्याचे दिसते. शिवारात दिवसेंदिवस कोल्ह्यांचा वावर वाढत असला तरी त्या प्रमाणात त्यांना अन्न उपलब्ध होत नसल्याचे प्राणीमित्रांचे मत आहे.
जंगलक्षेत्रात अन्न पाण्याच्या उपलब्धतेसाठी काही कृत्रिम उपाययोजना करता येतात. पाण्याचे हौद तयार करून त्याद्वारे प्राण्यांची तहान भागविता येते. मात्र, शिवारात वावरणाऱ्या प्राण्यांची तहान भूक भागविण्यासाठी काहीच कृत्रिम उपाययोजना आखता येत नाहीत. शिवारातील परिस्थिती वारंवार बदलत असते. काही पिकांची काढणी तर काही ठिकाणी लागवड होते. त्यामुळे निर्माण करण्यात आलेली कृत्रिम उपाययोजना किती काळ टिकेल आणि त्याचा प्राण्यांना फायदा होईल का, हे निश्चितपणे सांगता येत नसल्याचे प्राणिमित्र सांगतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे शिवारात वावरणाऱ्या प्राण्यांना पाण्याची आवश्यकता भासते. ते त्यांना सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे किमान प्राण्यांची तहान भागविता येईल, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन हौद तयार करावेत, असेही काही प्राणिमित्र सांगतात.
म्हणीपुरता शाकाहारी; पण कोल्हा मांसाहारीच
कोल्ह्याच्या बाबतीत एक गमतीदार बाब आहे. कोल्हा शाकाहारी की मांसाहारी याबाबत वनविभाग अनभिज्ञ आहे. त्याच्या आहाराबद्दल निश्चित काही सांगता येत नसल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’, असं म्हटलं जात. तसेच ‘उसाला लागल कोल्हा’ हे मराठी गीतही सर्वश्रूत आहे. यातून कोल्हा ‘शाकाहारी’ असावा, असाचं बहुतांश जणांचा समज झालाय. मात्र, कोल्हा हा चक्क मांसाहारी प्राणी आहे. छोटे सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी हे त्याचे खाद्य आहे. तसेच शेळ्या-मेंढ्यांची करडे व कोंबड्यांवरही तो हल्ला करतो. मेलेली जनावरेदेखील तो खातो, असे प्राणीतज्ज्ञ सांगतात.
प्रत्येक महावीर जयंतीवेळी आम्ही संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. त्यातून प्राणी वाचविण्याचा संदेशही देतो. मात्र, आज महावीर जयंती असताना योगायोगाने आमच्याकडून एका प्राण्याचे प्राण वाचले. ही आमच्यासाठी समाधानकारक बाब आहे. प्राण्यांच्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी प्रशासनानेही सुसंवाद साधून पर्यावरण रक्षणासाठी एकजूट करावी. ज्यामुळे ब्लॅक पँथरसारख्या घटना टाळता येतील.
- अमोल शिंदे, अॅनिमल आॅफिसर, उच्च न्यायालय प्राधिकृत
मांसाहार हा कोल्ह्याचा मूळ आहार आहे. मात्र, कधीकधी तो कंदही खातो. त्यातून तो त्याची तहान भागवतो; पण ऊस किंवा द्राक्ष कोल्हा कधीही खात नाही. कोल्ह्याचा वावर असल्याने उसाची मोडतोड होते. उंदीर, घूस खाण्यासाठी तो जमीन पोखरतो. त्यामुळे उसाचे नुकसान होते. मात्र, तो ऊस खातो, हे म्हणणे चुकीचे आहे.
- रोहन भाटे, मानद वन्यजीवरक्षक
५करवडी कॉलनीतील भारमल यांच्या घरासमोर कोल्हा बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती गुरुवारी सकाळी सर्पमित्र सलीम मुल्ला आणि विनायक दळवी यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वनमंत्रालयाचे अॅनिमल वेलफेअर आॅफिसर अमोल शिंदे यांना दिली.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमोल शिंदे व प्रांजल शिंदे करवडी कॉलनीत पोहोचले. त्यांनी कोल्ह्याची स्थिती पाहून त्याला इलेक्ट्रॉल पावडर पाजली. ज्यामुळे काही वेळाने त्याची हालचाल जाणविण्यास सुरुवात झाली.
काही वेळानंतर कोल्ह्याला उपचारासाठी कऱ्हाडातील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉ. बोरडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्ह्यावर उपचार केले.
कोल्ह्याला कोणतीही जखम अथवा आजार नसल्याचे मत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच गत पाच-सहा दिवसांपासून तो उपाशी असावा, असा अभिप्राय नोंदविला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे एस. जे. गवते, एस. टी. संकपाळ, एस. व्ही. पाटील त्याठिकाणी आले. उपचारानंतर त्यांनी कोल्ह्याला ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वन कार्यालयात कोल्ह्यावर उपचार सुरू होते.