ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना लसीपासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:12+5:302021-02-13T04:37:12+5:30
कोपर्डे हवेली : कोरोनाच्या काळात अनेक घटक कोरोना योद्धा म्हणून लढले. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावागावात आघाडीवर राहून काम करत ...

ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना लसीपासून दूरच
कोपर्डे हवेली : कोरोनाच्या काळात अनेक घटक कोरोना योद्धा म्हणून लढले. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावागावात आघाडीवर राहून काम करत होते. कोरोना काळातील योद्ध्यांना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या कोरोना लसीकरणापासून ग्रामपंचायतीचे कर्मचारी अजूनही दूरच असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले तर काहींना लसीकरण सुरू आहे. परंतु, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
दिनांक २० मार्चपासून कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यास सुरुवात झाली आणि बघताबघता याचे लोण ग्रामीण भागात पोहोचले. त्याचा ताण महसूल, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतींवर येऊन पडला. या सर्व विभागांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हातात हात घालून काम केले.
गावागावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सर्वात पुढे होते. सुरुवातीच्या काळात ज्या प्रभागात रुग्ण सापडले, त्याठिकाणी कन्टेनमेंट झोन करण्याचे काम या कर्मचाऱ्यांवरच होते. तसेच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर ग्रामपंचायतीचा कर्मचारी कायमच असायचा. या कालखंडात कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास काम केले. मग कोरोनाची लस देताना त्यांच्यासोबत दुजाभाव का? असा प्रश्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. शासनाने लवकरात लवकर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.