गोविंदा आला रे आला... दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पळा रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST2021-08-28T04:42:43+5:302021-08-28T04:42:43+5:30

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध ...

Govinda aala re aala ... The next day he ran to the hospital | गोविंदा आला रे आला... दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पळा रे

गोविंदा आला रे आला... दुसऱ्या दिवशी दवाखान्यात पळा रे

दहीहंडी आणि तरुणाईचा उत्साह हे जणू समीकरणच बनलेले असते. अनेक भागात ठराविक दहीहंडी मंडळे उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिद्ध असतात. त्यांना तोड देण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतात. या मंडळांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर शहरांमध्ये जाऊन दहीहंडी फोडण्यासाठी नियोजन केले जाते. ट्रक टेम्पोमधून गोविंदा पथके शहरात जातात. अनेकदा ट्रक चालकाच्या केबिनवरील हौद्यावर बसून काही गोविंदा जातात. दहीहंडी फोडण्यासाठी जाताना किंवा परत गावी जाताना अपघात होऊन गोविंदा जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

दहीहंडी कार्यक्रमात अतिउत्साहाच्या भरात गोविंदांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे लहान - मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. गोविंदांचे जास्तीत जास्त मनोरे उभारले जाऊ नयेत, यासाठी आयोजकांकडून पाण्याचे फवारे मारले जातात. काही ठिकाणी तर टॅंकर किंवा अग्निशमन दलाच्या बंबाचाही वापर केला जातो. या पाण्यांना दाब जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या अतिमाऱ्यामुळे कानठाळी बसणे, कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका असतो. पाण्यामुळे हात - पाय घसरून गोविंदा पडतात. अशावेळी त्यांना झेलण्यासाठी शेकडो कार्यकर्ते असल्याचे पाहणाऱ्याला दिसत असले तरी एखादा गोविंदा झेलता आला नाही तर तो खालील कार्यकर्त्यांच्या डोक्यात पडतो. अशा वेळी तर त्याच्या अवयवांना मोठी इजा होण्याची शक्यता असते.

गाव पातळीवरील दहीहंड्या कमी उंचीच्या असल्या तरी किमान तीन ते चार थर लावावे लागतात. अशावेळी दहीहंडी उंच नाही त्याला काय होतंय, असा समज करून सर्वात वरच्या थरातील गोविंदा हेल्मेट किंवा इतर सुरक्षेची साधने वापरत नाहीत. दहीहंडी फुटतेही, परंतु खालचे थर ढासळतात आणि शेवटचा गोविंदा दोरीला धरून लटकत असतो. अशा वेळी दोरी सोडून उडी मारण्याशिवाय पर्याय उरत नाही. अन् त्यातूनही अपघात होतात.

दहीहंडीच्या दिवशी गोविंदांना लहान - मोठ्या इजा झाल्या तरी उत्साहाच्या भरात काही कळत नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी अंथरूण घेऊन झोपण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यातून गावोगावचे दवाखाने गोविंदा पथकांनी भरून जातात. गंभीर अपघात असतील तर अनेकदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Govinda aala re aala ... The next day he ran to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.