‘अच्छे दिन’साठी शासन अपयशी : शिंदे
By Admin | Updated: January 5, 2015 00:41 IST2015-01-04T22:31:05+5:302015-01-05T00:41:26+5:30
राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य

‘अच्छे दिन’साठी शासन अपयशी : शिंदे
पुसेगाव : ‘शेतकरी व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवून केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत आले. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत व ऊस, दूध उत्पादकांसह शेती मालाला दर देण्यात युती शासन अपयशी ठरले आहे, कुठे गेले अच्छे दिन,‘ असा सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.
बुध, ता. खटाव येथील नूतन ग्रामविकास, अंतर्गत रस्ता डांबरीकरण भूमिपूजन व बसस्थानक लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, सतीश फडतरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, सरपंच मंगल खवळे, उद्योजक विनायकराव काळे, प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र कचरे, संभाजी घाटगे, सुधीर जगदाळे, नितीन गाडे, विजय सूर्यवंशी, विजय महामुलकर, समीर सय्यद, अशोक शेडगे, गणेश मेळावणे, चंद्रकांत तांदूळवाडकर, हिंंदुराव चव्हाण, फडतरवाडीचे उपसरपंच जगदाळे, पांगरखेलचे ज्ञानेश्वर जगताप, सोसायटीचे अध्यक्ष कृष्णचंद्र जगदाळे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, ‘आघाडी शासनाच्या काळातही अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळाचे प्रश्न अतिशय तीव्र होते; पण आघाडी शासन शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे असल्यामुळे ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना तातडीने मदत केली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन चांगलाच दिलासा दिला होता. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कृषी क्षेत्राला चांगले दिवस आणल्यामुळे शेतकरी चांगलाच समाधानी होता.’ (वार्ताहर)