दारिद्र्याच्या भट्टीतून निघणार सोन्याच्या विटा

By Admin | Updated: January 14, 2015 23:41 IST2015-01-14T21:29:18+5:302015-01-14T23:41:12+5:30

अतिटमधील उपक्रम : वीटभट्टी कामगारांची मुलं निघाली शाळेला

Gold bricks to come out of poverty belt | दारिद्र्याच्या भट्टीतून निघणार सोन्याच्या विटा

दारिद्र्याच्या भट्टीतून निघणार सोन्याच्या विटा

दशरथ ननावरे - खंडाळा -प्राथमिक शिक्षण मुलांचा हक्क आहे, पण रोज पोटाची खळगी भरण्यासाठी काबाडकष्ट करणारी अनेक कुटुंंबं आहेत. जिथं खायचे वांदे तिथे शिक्षणाचा कसला आलाय छंद? कष्टप्रद जीवन जगणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांची त्यांच्यामागे फरफट होते. या शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे आणि त्यांच्याही जीवनात नवी उमेद निर्माण व्हावी, यासाठी खंडाळा तालुक्यातील अतिट येथील प्राथमिक शाळेने वीटभट्टी कामगारांच्या ३० मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल केले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
अतिट परिसरात अनेक वीटभट्ट्यांवर रायगड, भोर, कर्नाटक येथील अनेकजण काम करतात. त्यांची कुटुंबे काही काळासाठी वास्तव्यास असतात. या कामगारांची मुलेही त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे ती नेहमीच शाळेपासून दुरावलेली आहेत. अशा मुलांसाठी शासनाने सक्तीचे शिक्षण केले असले तरी पालक त्यांना शाळेत पाठवित नाहीत. अतिट शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी या मुलांचा शोध घेतला. सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने पालकांचे उद्बोधन केले. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि तब्बल तीस मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले. वयोगटानुसार वर्गात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत त्यांना दाखल करून घेतले. पाठ्यपुस्तके व लेखनसाहित्य व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेत पहिले पाऊल पडलेल्या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या मुलांच्या शाळेंची व शिक्षणाची जबाबदारी आता ग्रामस्थांनी उचललेली आहे.
‘ज्ञानदान’ हे श्रेष्ठदान समजून काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवरही तालुक्यातून शाबासकीची छाप पडत आहे. या मुलांच्या शाळेत स्वागतासाठी सरपंच निवृत्ती जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष भानुदास यादव, उपाध्यक्ष आनंदराव जाधव, अंकुश जाधव, सुनील जाधव, गणेश मांढरे, संध्या सुतार, उपशिक्षक सुरेश कदम, प्रकाश यादव, सचिन ढमाळ, अशोक लिमण उपस्थित होते.

सहा ते चौदा वयोगटातील कुणीही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी तालुकयातील सर्व शाळांमधून घेतली आहे. वीटभट्टी कामगारांची जी कुटुंबे नव्याने आली आहेत, त्यांच्या मुलांसाठीही तातडीने शिक्षणाची योजना करण्याचा अतिट शाळेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. शाळा व्यवस्थापन समितीनेही दक्षपणे काम केल्याने शिक्षकांचा उत्साह वाढतो. सर्व शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे.
संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, खंडाळा

Web Title: Gold bricks to come out of poverty belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.