साडेचौदा कोटींचा लेखाजोखा द्या!
By Admin | Updated: August 12, 2014 23:14 IST2014-08-12T22:31:24+5:302014-08-12T23:14:21+5:30
किवळ-खोडजाईवाडी बंधारा : निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

साडेचौदा कोटींचा लेखाजोखा द्या!
मसूर : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले किवळ-खोडजाईवाडी बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले. प्रारंभी २ कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीवरून दुप्पट-तिप्पट नव्हे तर तब्बल साडेचौदा कोटी रूपयांची वाढीव तरतूद होऊनही अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे काम का होत आहे, असा सवाल करून या तलाव्याच्या कामावर नक्की किती खर्च आला? साडेचौदा कोटी रूपयांचे काय काम केले, याचा लेखाजोखा संबंधित विभागाने देण्याची मागणी किवळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साळुंखे यांनी केली.
साळुंखे म्हणाले, ‘किवळ भागाने पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. टँकरने पाणी पिण्याची पावसाळ्यातही किवळ गावावर वेळ आली होती. किवळ-खोडजाईवाडीदरम्यान तलाव झाल्यास आसपासच्या विहिरींना, शेतीला पाणी उपलब्ध होईल. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने २ कोटी ८५ लाख रूपये तरतुदीचा मोठा तलाव बांधण्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून सुरू केले आहे. यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तथापि अधिकारी-सुपरवायझर यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सध्या निदर्शनास आले आहे. तलावाच्या साठवणभिंंतीत मातीमिश्रित वाळू व खडीचा वापर अल्प सिमेंटमध्ये करून ग्रीटचा वापर जास्त केला आहे. तलावाची पीचिंगची कामे अद्याप तशीच आहेत. अधिक पाणीसाठा झाल्यास सांडवा केव्हाही फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. २ कोटी ८५ लाखांचे प्रत्यक्षात काम असले तरी दीड कोटीचेही काम झाले नसताना वाढीव साडेचौदा कोटी रूपयांच्या निधीची आणखी तरतूद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात किती कोटींचे काम केले, याचे पुरावे संबंधितांनी द्यावेत.’
या तलावाचे काम जुन्या तलावाच्या जागीच केले. पूर्वीच्या तलावाच्या मातीचाच वापर केला. माती कमी पडत असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केल्यावर ग्रामपंचायतीने शासनाच्या शेतीशाळेच्या सात एकरातील माती या तलावासाठी दिली. तलावाच्या भराव्यासाठी ही माती नेत असताना मोठे डबरे, खडे तसेच पडून ठेवले असून, तेथे गाळ भरण्याचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सात एकर जमीन नापीक, निरूपयोगी झाली आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करतानाच, ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी दुर्लक्ष झाल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.
यावेळी प्रकाश साळुंखे, सचिन साळुंखे , पै. शिवाजीराव साळुंखे, सागर साळुंखे, संतोष साळुंखे, राजेंद्र साळुंखे, विजय साळुंखे, सुहास साळुंखे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
तलावाच्या सांडवा भरावासाठी अल्प सिमेंट आणि मातीमिश्रित वाळू-खडीचा तसेच ग्रीटचा वापर करण्यात आला आहे. संबंधित सुपरवाईझरना काही ग्रामस्थांनी जाब विचारून असे निकृष्ट काम करून भविष्यात हा तलाव टिकणार का, असा सवाल केला. त्यावर ‘हेच प्रमाण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,’ असे स्पष्टीकरण सुपरवायझरनी दिले. म्हणजे अधिकारी-कंत्राटदार यांच्या संगनमतानेच हे निकृष्ट काम सुरू आहे.
- प्रदीप साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, किवळ