सोने घ्या; पण टप्प्याटप्प्याने!

By Admin | Updated: January 6, 2015 00:46 IST2015-01-05T23:42:01+5:302015-01-06T00:46:48+5:30

व्यापाऱ्यांचा सल्ला : दरांविषयी अजूनही बाजारपेठेत अनिश्चितताच

Get gold; But in phases! | सोने घ्या; पण टप्प्याटप्प्याने!

सोने घ्या; पण टप्प्याटप्प्याने!

सातारा : जागतिक बाजारपेठेतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोने बाजार पेठेवर होत आहे. सोन्याचे दर अजून वाढणार का कमी होणार, याविषयी अजूनही ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत. एकदम खरेदी करण्यापेक्षा तीन-चार टप्प्यांमध्ये सोन्याची खरेदी करून ग्राहकांनी सुवर्णसंचय करावा, असा सल्ला सुवर्ण व्यापारी देत आहेत.
सोन्याचा दर प्रामुख्याने शेअर मार्केट, डॉलरची किंमत, तेलाची किंमत आणि सरकारमधील बदल यावर प्रामुख्याने ठरते. गतवर्षी सुवर्णाला ३२ हजार ८५० ची उच्चांकी झळाळी जुलैमध्ये आली होती. त्यावेळी सोने ३५ हजारांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अचानकच आॅक्टोबरमध्ये सोन्याने २५ हजारांचा तळ गाठला. जुलैमध्ये आलेल्या उच्चांकी दरानंतर या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडली होती. केवळ पंधरा दिवसांतच हा दर गडगडून २५ हजारांवर स्थिरावला. या दरम्यानच बाजारपेठेत सोने २२ हजारांवर पोहोचेल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. दराची ही गडगड लक्षात आल्यानंतर मात्र प्रत्येकानेच हातचे राखून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने सुवर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
आता बाजारपेठेत सोन्याचा दर २६ हजार ९०० रुपये आहे. अजूनही हा दरात चढ-उताराची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. ज्यांना सुवर्ण गुंतवणूक करायची आहे, त्यांनी खरेदीचे टप्पे ठरवावेत. त्यामुळे सोने सरासरी दरामध्ये गुंतवले जाऊ शकते, असा सल्ला व्यापारी देतात. (प्रतिनिधी)


सोने मोडताना पैसे जास्त का
सोन्याचे अलंकार घेतले तर घडणावळ आणि घटणावळ दोन्ही वजा करून राहिलेली रक्कम किंवा सोने ग्राहकांना दिले जाते. काहीदा गुंतवणुकीचा चोख मार्ग म्हणून नाणी, वळी आणि बिस्कीट घेण्याकडे कल ग्राहकांचा असतो; पण पेढीमध्ये मोडायला जाताना सोन्याच्या दरापेक्षा हे दर तीनशे रुपयांनी कमी असतात. याचे कारण सांगताना व्यापारी त्याला ‘मार्जिन’ म्हणतात. सोन्याच्या दरात चढ-उतार भरपूर असतात. अशावेळी दराचा समतोल टिकविण्यासाठी आणि व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागू नये म्हणून हा ‘मार्जिन’ सोडला जातो.
ग्राहकांसाठी मोबाईल ट्रेडिंगही
अनेक ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करायची असते; पण रोजच्या रोज त्यांचा या बाजारपेठेशी संबंध येत नाही. दर कमी होणे आणि वाढणे या दोन्ही बाबींबाबत ते अनभिज्ञ असतात. बाजारपेठेची माहिती देणे आणि त्यांची नियोजित रक्कम सोन्यात गुंतविण्याचे अधिकार ग्राहक व्यापाऱ्यांना देत आहेत. व्यापारीही रक्कम गुंतवण्याआधी याविषयी ग्राहकांना माहिती देतात. सुवर्ण खरेदीत अलीकडे हे मोबाईल ट्रेडिंग सर्रास पाहायला मिळत आहे.


हे टाळावे
कमी दरात सोने मिळतंय म्हणून घेऊ नये
नवख्या दुकानांमध्ये सोने मोडायला जाऊ नये
कमी मजुरीचा दर आहे म्हणून अलंकार करायला टाकू नयेत
पावतीशिवाय सोने खरेदी करण्याचा मोह अजिबातच नको

सोने बाजारपेठेत दर जागतिक स्तरावर ठरतात. त्यामुळे सोन्याच्या दराविषयी भाष्य करणे अवघड होते. ग्राहकांनी मात्र, चाणाक्षपणे यात गुंतवणूक करावी. यासाठी व्यापारी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-कुणाल घोडके, सातारा


ग्राहकांनी हे करावे
जुन्या पेढीमधूनच सुवर्ण खरेदी करावी
खरेदीच्या सर्व पावत्या जपून ठेवाव्यात
जिथून सोने खरेदी कराल, तिथेच ते मोडायला जावा
चोख सोने, वजन, दर, मजुरी याविषयीची माहिती पावतीवर लिहिली असल्याचे तपासावे

Web Title: Get gold; But in phases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.