सराफ दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 00:47 IST2015-06-11T22:05:43+5:302015-06-12T00:47:31+5:30
शनिवार पेठेतील घटना : फर्निचर, साहित्यांचे नुकसान

सराफ दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट
सातारा : दागिने वितळविण्याच्या गॅसचा अचानक स्फोट झाल्याने शनिवार पेठेत प्रचंड खळबळ उडाली. स्फोटाच्या आवाजाने घरातील लोक धावत बाहेर आले. या स्फोटामध्ये दुकानातील फर्निचर आणि साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
शनिवार पेठेतील शनी मारुती मंदिराच्या पाठीमागे दुकान गाळे आहेत. यातील एक गाळा दागिने तयार करणाऱ्या कारागिरांनी भाड्याने घेतला आहे. या ठिकाणी सर्व कारागिर दागिने तयार करतात. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कारागिर घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान उघडत असत. दरम्यान, तत्पूर्वीच सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकानातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की दुकानाचे शटर उडून बाहेर पडले. मोठा आवाज झाल्याने नागरिकही धावून आले. नेमक काय झालंय, हे कोणालाही समजेनासे झाले होते. काही वेळानंतर दुकानातून आगीच्या ज्वाला बाहेर आल्या. त्यावेळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. दुकानात आग लागल्यानंतर नागरिकांनी घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी दहानंतर हा परिसर लोकांनी गजबजलेला असतो. त्याकाळात स्फोट झाला असता तर अनर्थ झाला असता. (प्रतिनिधी)