उपमार्गावर कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST2021-06-30T04:25:11+5:302021-06-30T04:25:11+5:30
कऱ्हाड : पुणे- बंगळुरू महामार्गाच्या उपमार्गावर व भराव पुलाखाली स्थानिक व्यापारी, दुकानदार, नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे ...

उपमार्गावर कचरा
कऱ्हाड : पुणे- बंगळुरू महामार्गाच्या उपमार्गावर व भराव पुलाखाली स्थानिक व्यापारी, दुकानदार, नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे येथील उपमार्गाला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाठारपासून ते उंब्रजपर्यंत असे चित्र पाहायला मिळत आहे.
गटारीची दुरवस्था
कऱ्हाड : शहरात अंतर्गत भागासह वाढीव भागात गटारीची सध्या दुरवस्था झाली आहे. रस्त्याकडेला असलेल्या गटारात अन्न पदार्थ, कचरा, प्लास्टिक पिशव्या साचून राहत आहेत. त्यामुळे गटर तुंबून पाणी व कचरा रस्त्यावर येत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
पथदिवे नादुरुस्त
कऱ्हाड : येथील दत्तचौक ते कृष्णा नाका मार्गावर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकातील, तसेच रस्त्याकडेला असलेल्या पथदिव्यांपैकी काही पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रात्री अंधार पडत असून, पादचाऱ्यांना त्रास होत आहे. बंद पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालकांमधून केली जात आहे.
रस्त्याकडेला पार्किंग
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलालगत दिवंगत यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीसमोर दिवसा, तसेच रात्रीच्या वेळी चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पुलाखाली वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी उभे राहत असून, त्यांच्याकडून काहीच कारवाई केली जात नसल्याचे दिसते.