शहरातला कचरा रस्त्यावर !

By Admin | Updated: March 29, 2016 00:46 IST2016-03-29T00:30:20+5:302016-03-29T00:46:30+5:30

लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़

The garbage in the city! | शहरातला कचरा रस्त्यावर !

शहरातला कचरा रस्त्यावर !


लातूर : नांदगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास नांदगांव व वरवंटी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे शहरातला कचरा रस्त्यावर साचला आहे़ गेल्या महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, शहरात जिकडे तिकडे कचरा साचला आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ कचऱ्याच्या प्रश्नावर नांदगांव ग्रामस्थ व मनपा अधिकाऱ्यांची बैठक अनेकदा झाली़ परंतू, तोडगा निघाला नसल्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर कचरा साचला आहे़ हरीत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लातूर मनपाने केले असल्याचा आरोप ग्रामस्थांचा असून, न्यायालयाच्या आदेशानुसार कचऱ्याची विल्हेवाट न लावता डेपोवर कचरा टाकला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़
लातूर शहरातील कचरा नांदगांव येथील कचरा डेपोवर गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जातो़ परंतू, ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात नाही़ शिवाय, कचरा डेपोला संरक्षण भिंत बांधली गेली नाही़ तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते़ त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ परिसरातील पाणी दूषीत होत आहे़ त्यामुळे नागरिकांनी हरीत न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंत बांधण्याचे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या़ परंतू, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता कचरा टाकला जात असल्याने गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला आहे़ त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातला कचरा शहरातल्या रस्त्यांवर साचत आहे़ दररोज १०० टन कचरा साचत असल्याने सद्यस्थितीत शहरात ३ हजार टन कचरा साचला आहे़
पोलिस बंदोबस्तात मनपाने कचरा डेपोवर कचरा टाकण्या प्रयत्न केला़ परंतू, नांदगांव व परिसरातील गावकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे़ दररोज २५ ट्रॅक्टर कचरा डेपोवर टाकला जात होता़ दोन दिवसांपूर्वी १५ ट्रॅक्टर कचरा पोलिस बंदोबस्तात टाकण्यात आला़ ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी विरोध केला आहे़ त्यामुळे पुन्हा शहरातला कचरा ठप्प झाला आहे़ औसा रोड, नांदेड नाका, विवेकानंद चौक, रेणापूर नाका व रिंगरोड परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत़ स्वच्छता निरीक्षक कलीम शेख यांनी गावकऱ्यांची भेट घेवून कचरा डेपोवर टाकण्या संदर्भात विनंती केली़ परंतू, अगोदर न्यायालयाच्या निर्देशानुसार उपाययोजना करा नंतरच कचरा टाका अशी भुमिका गावकऱ्यांनी घेतली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The garbage in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.