कऱ्हाड : येथील शहर पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल असलेल्या गुंडावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश करण्यात आला होता. मात्र, आदेश होताच संबंधित गुंड पसार झाला. त्यातच गृह विभागाच्या सचिवांनीही हा आदेश कायम ठेवल्याने परागंदा झालेल्या गुंडाला पुण्यातून ताब्यात घेत पोलिसांनी त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.कुंदन जालिंदर कराडकर (रा. गजानन हाउसिंग सोसायटी, कऱ्हाड) असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये राहणारा कुंदन कराडकर हा शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून कुंदन कराडकर याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित झाले होते. मात्र, आदेश पारित झाल्यानंतर तो पसार झाला.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थानबद्ध आदेशावर मुंबई मंत्रालयाच्या गृहविभागात सुनावणी झाली. त्यामध्ये सचिवांनी स्थानबद्धतेचा आदेश कायम ठेवला. त्यानुसार पोलिसांनी कुंदन कराडकर याला पुण्यातून ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
Satara: गुंड कुंदन कराडकरला पुण्यातून घेतले ताब्यात, स्थानबद्धतेचा आदेश निघताच झाला होता पसार
By संजय पाटील | Updated: June 25, 2024 18:40 IST