टळटळीत उन्हात चाले ‘हा खेळ सावल्यांचा’

By Admin | Updated: March 16, 2016 23:52 IST2016-03-16T22:19:27+5:302016-03-16T23:52:00+5:30

गळ्यातही जादू : खाकीच्या आतला ‘मिमिक्री आर्टिस्ट’ मित्रांचे करतो मनोरंजन; दीपक कणसे यांचे नावच पडलेय ‘नाना’

'This game is shadow' | टळटळीत उन्हात चाले ‘हा खेळ सावल्यांचा’

टळटळीत उन्हात चाले ‘हा खेळ सावल्यांचा’

अजय जाधव-- उंब्रज --माणसाच्यात असलेली कला ही त्यांचे नाव मोठे करते; परंतु सातारा जिल्हा पोलिस दलात असा एक अवलिया आहे की, त्यांच्या कलेमुळे त्यांचे नावच बदलले गेले आहे. विविध कलाकारांचा आवाज हुबेहूब काढणे, सावलीचा खेळ करणे या कलेमुळे सातारा जिल्हा पोलीस दलात त्यांना ‘नाना’ या नावाने ओळखले जाते.
पोलीस नाईक दीपक शिवाजी कणसे ऊर्फ नाना हे गेली १९ वर्षे सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. शालेय जीवनापासून त्यांना चित्रपटाचे आकर्षण. त्यातच नाना पाटेकर यांचे ते फॅन. या प्रेमापोटीच त्यांनी नाना पाटेकर यांच्या आवाजाची नक्कल सुरू केली. सरावानंतर ते त्यांच्यासारखेच आवाज काढू लागले. मिथून, निळू फुले, शक्ती कपूर, राजकुमार यांचेही आवाज नाना हुबेहूब काढतात.
आवाजाची कला अवगत करत असताना त्यांनी ‘सावलीचा खेळ’ ही कला आत्मसात केली. आवाज दोन हातांचा, बोटांचा ते असा वापर करतात की त्याच्या सावलीतून पोपट, उडता पक्षी, हरीण, कुत्रा, गाय, बदक, मांजर, टोपी यांच्या प्रतिकृती तयार होतात. हे सावलीचे खेळ एवढ्या वेगाने काम करतात की, सावलीत जणू खरोखरचे प्राणीच असल्याचा आभास निर्माण होतो. असा हा ‘नाना’ हा कायम हसत खेळत पोलीस दलात वावरत असतो. यापूर्वी पोलीस दलाकडून सहाय्यता निधीसाठी आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला जात असे. अशा कार्यक्रमातून कला सादर करण्यासाठी नानांना हमखास बोलावणे असे.
विविध व्यक्तींचे आवाज काढणे, अर्थात मिमिक्री ही अत्यंत कष्टसाध्य कला आहे. प्रत्येकाच्या आवाजाचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते. कोणत्याही दोन व्यक्तींच्या आवाजाचे वैशिष्ट्य एकसारखे नसते. त्यामुळे ‘मिमिक्री आर्टिस्ट’ ज्याचा आवाज काढायचा असेल, त्याच्या वैशिष्ट्यांच्या जास्तीत जास्त जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. या प्रक्रियेत घशावर तर ताण पडतोच; परंतु बोलताना संबंधित कलावंत ज्याप्रमाणे अंगविक्षेप करतो, त्याचीही नक्कल अनेकदा करावी लागते. तरच जास्तीत जास्त हुबेहूब आवाज काढता येतो. ही कला नानांनी एवढ्या धावपळीच्या नोकरीत असून कष्टाने वश करून घेतली आहे.
सावल्यांचा खेळ तर खूपच कमी लोकांना जमतो. बोटांच्या वेगवेगळ्या रचना करून सावली निरखून खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि मगच लोकांसमोर ही कला सादर करावी लागते. हा ‘शॅडो प्ले’ सध्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा लोकप्रिय होताना दिसतो आहे. तथापि, नानांना कोणत्याही स्टेजवर जाऊन बडेजाव मिरवायचा नाही. पोलीस दलातले मित्र खूश झाले म्हणजे नाना खूश!


मित्रांचा आग्रह मोडवत नाही
पोलीस दलात कामाचा ताण सर्वांवरच असतो. अशा वेळी मी विविध विनोद, आवाज नक्कल करतो. यामुळे वातावरण हसते राहते. अनेकवेळा कामानिमित्त जुने मित्र ठाण्यात येतात किंवा मी इतर ठाण्यात जातो. त्यावेळी मला या कला सादर कराव्याच लागतात. यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य मला या कलेसाठी प्रेरणादायी ठरते, असे नानांनी सांगितले आणि लगेच नाना पाटेकर यांचा ‘साला एक मच्छर आदमी को.. ,’ हा डायलॉग ‘सेम’ आवाजात ‘सेम’ अ‍ॅक्शनमध्ये सादर केला.

Web Title: 'This game is shadow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.