गमेवाडीत बिल थकल्याने वीज, पाण्याची जोडणी तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:01+5:302021-06-27T04:25:01+5:30
चाफळ : चाफळ विभागातील गमेवाडी येथील ग्रामपंचायतीने तब्बल लाखो रुपयांच्या आसपास वीजबिल थकवल्याने वीज वितरण कंपनीने येथील दिवाबत्ती व ...

गमेवाडीत बिल थकल्याने वीज, पाण्याची जोडणी तोडली
चाफळ : चाफळ विभागातील गमेवाडी येथील ग्रामपंचायतीने तब्बल लाखो रुपयांच्या आसपास वीजबिल थकवल्याने वीज वितरण कंपनीने येथील दिवाबत्ती व नळ पाणीपुरवठा कनेक्शन तोडले आहे. याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहे. अनेक वर्षांपासून काही घराच्या नोंदी न केल्याने ग्रामपंचायतीचा मिळणारा कर बुडाल्याने ही वेळ आली आहे. ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराची चौकशी व्हावी, असे निवेदने संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी देऊनही याची चौकशी केली जात नाही. पंधरा दिवसांत चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, गमेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ आघाडीचा भोंगळ, मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्टाचारी कारभार सुरू आहे. थकित वीज बिल व नोंदी करणे टाळणे हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्याचा फटका गमेवाडीकरांना बसला आहे. यापूर्वी तेरावा व पंधराव्या वित्त आयोगामधून मंजूर झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचा आरोप करत गमेवाडी येथे अनेक ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. मात्र घरमालकांनी रितसर ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही नोंदी केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीस मिळणार कर बुडत आहे. गावाचा विकास खुंटला आहे. ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध प्रकारच्या निधीची वापर योग्य पद्धतीने केला गेला नाही. याची पुराव्यानिशी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित विभागास अनेक वेळा निवेदनाद्वारे चौकशी करण्याची मागणी करूनही संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. चूक नसताना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गावात कित्येक वर्षे झाली नवीन घरांची वाढ झाली असूनदेखील त्याची नोंद धरली नसल्याने त्यामुळे गावाचा कर वसूल कमी प्रमाणात होत आहे.
लोकांना अंधारात न ठेवता लवकरात लवकर ग्रामपंचायतीने करवसुली करून थकीत वीजबिल त्वरित भरावे जेणेकरून ग्रामस्थांना आणि पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागू नये. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. निवेदनावर श्रीमंत नलवडे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.