‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘अंधारात’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:06+5:302021-03-24T04:37:06+5:30
कोपर्डे हवेली : सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय गत काही दिवसांपासून अंधारात आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज वितरण ...

‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ‘अंधारात’!
कोपर्डे हवेली : सैदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय गत काही दिवसांपासून अंधारात आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने महाविद्यालयाचे कनेक्शन तोडले असून महाविद्यालयातील सर्व यंत्रणा बंद स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कऱ्हाडला सैदापूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत सुमारे दीड हजार प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत आहेत, तर यातील अनेकजण शासकीय वसतिगृहात वास्तव्यास आहेत. या महाविद्यालयाचे वीज बिल अनेक वर्षांपासून थकीत आहे. त्याबाबत महाविद्यालयाशी वीज कंपनीचा पत्रव्यवहारही झाला होता. मात्र, तरीही बिलाचा भरणा झाला नसल्यामुळे गत आठ दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीने महाविद्यालयाचे कनेक्शन तोडले. या महाविद्यालयातील विद्यार्थी दोन शिफ्टमध्ये प्रशिक्षण घेतात. काहींचे प्रशिक्षण दिवसा, तर काहींचे रात्री उशिरापर्यंत सुरू असते. तसेच येथील प्रशिक्षणाची बहुतांश साधने ही वीज उपकरणे आहेत. मात्र, वीज तोडल्यामुळे महाविद्यालयातील सर्व यंत्रणा बंद पडली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारी वीज उपकरणेही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महाविद्यालयासह वसतिगृहात गत काही वर्षांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी काही घटनांचा उलगडा झाला, तर काही चोरीच्या घटना अद्यापही उघडकीस आलेल्या नाहीत. सध्या महाविद्यालयासह वसतिगृहातही रात्रीच्यावेळी अंधार असल्यामुळे चोरीची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येथील वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे सध्या पालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- चौकट
संस्थेचा राज्यभर लौकिक
कऱ्हाडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राज्यभर लौकिक आहे. साताऱ्यासह आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थीही याठिकाणी शिक्षणासाठी येतात. व्यवसायाचे शिक्षण घेऊन नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी हे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. मात्र, महाविद्यालयाचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. कनेक्शन कधी जोडणार आणि प्रशिक्षण पूर्ववत कधी सुरू होणार, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना सतावत आहे.
- चौकट
वसतिगृहातील विद्यार्थी घामाघूम
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांना सध्या वीज नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासह इतर खर्चासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. तसेच उन्हाळ्यामुळे वाढलेल्या उकाड्यात या विद्यार्थ्यांना रात्र घालवावी लागत आहे. उकाड्यातच डासांचा प्रादुर्भावही वाढला असून पंखे बंद असल्यामुळे विद्यार्थी घामाघूम होत आहेत.
फोटो : २३केआरडी०६
कॅप्शन : सैदापूर-कऱ्हाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर रात्री पूर्णपणे अंधारात असतो.